अनुभवातून लेखक विविध प्रकारची साहित्य निर्मिती करतो - जगन्नाथ शिंदे..........श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या वतीने कविसंमेलन व साहित्यिक मेळावा


कराड (राजसत्य) - साहित्य हा समाजाचा आरसा आहे. जीवन जगत असताना आलेल्या अनुभवातून लेखक विविध प्रकारची साहित्य निर्मिती करतो.वाचनामुळे भावनिक व बौद्धिक विकास होतो .सामाजिक परिवर्तनासाठी साहित्याचा वापर करता येतो. असे प्रतिपादन जगन्नाथ शिंदे यांनी केले. 


श्री मळाई देवी शिक्षण संस्था व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात यांचे संयुक्त विद्यमाने कविसंमेलन व साहित्यिक मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य जगन्नाथ शिंदे, शेती मित्र अशोकराव थोरात ,डॉ मोहन राजमाने ,दादाराम साळुंखे,श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे संचालक, कवी, मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते.


अशोकराव थोरात म्हणाले मराठी भाषेत विविध प्रकारचे समृद्ध साहित्य उपलब्ध आहे. तरुण पिढीने वाचनसंस्कृती जोपासली तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल. समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी मुलांच्या मनावर लहानपणापासून चांगले संस्कार करण्याची जबाबदारी वाढली आहे त्यामुळे चांगली पुस्तके वाचण्याची सवय लहानपणापासून लावली तर मुले इतर प्रसारमाध्यमांकडे वळणार नाहीत. मोहन राजमाने कवी संमेलन व साहित्य मेळाव्यामुळे तरुणांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळेल विद्यार्थ्यांमध्ये गुणांना वाव मिळेल.


कवी संमेलन व साहित्यिक मेळाव्यामध्ये परिसरातील नामवंत कवींनी आपली उपस्थिती दर्शवली व विचारांचा व आपल्या कवितांचे सादरीकरण केले या कवींचा श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय यांचे वतीने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केले. दादाराम सोळुंखेे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.प्रा. एस.डी. खंडागळे, किशोर धरपडे यांनी सूत्रसंचालन केले .प्रा. शिला पाटील यांनी उपस्थित साहित्यिक ,मान्यवर ,साहित्य प्रेमी ग्रामस्थांचे आभार मानले.