ए. आर. अंतुले’  त्यांचे हे वेगळे व्यक्तिमत्त्व समोर आले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "बनाम नर्गिस बाकलम ए. आर. अंतुले" पुस्तक प्रकाशित


ए. आर. अंतुले’  त्यांचे हे वेगळे व्यक्तिमत्त्व समोर आले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


‘बनाम नर्गिस बाकलम ए. आर. अंतुले’ पुस्तक प्रकाशित


मुंबई - ‘मन की बात’ आणि ‘दिल की बात’ यामधील फरकच नेहमी महत्त्वाचा ठरतो. कारण फक्त ‘दिल की बात’ दोन्ही बाजूंनी जपली जाते. बॅरिस्टर अंतुले यांचे व्यक्तिमत्त्व ‘दिल की बात’मधील आहे. ‘बनाम नर्गिस बाकलम ए. आर. अंतुले’ पुस्तकातून त्यांचे हे वेगळे व्यक्तिमत्त्व समोर आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री दिवंगत बॅ. अंतुले यांनी पत्नी नर्गिस यांना उर्दू भाषेतून लिहिलेल्या पत्रांचा अनोखा खजिना त्यांची मुलगी नीलम अंतुले यांनी पुस्तकरूपाने तयार केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून बॅ. अंतुले यांच्या प्रेमळ मनाची प्रचीती येत असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. नर्गिस यांनी बॅरिस्टरजींनी पाठवलेली पत्रे जपून ठेवली यालाही वेगळं महत्त्व असल्याचे ते म्हणाले. नर्गिस यांनी जपून ठेवलेली ‘दिल की बात’ त्यामुळे महत्त्वपूर्ण ठरते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंतुले यांच्याशी अतूट मैत्री होती. 1960 च्या दशकापासून ही मैत्री मी जवळून पाहत आलोय. ही मैत्री राजकारणापलीकडची होती. अंतुले डॅशिंग मुख्यमंत्री होते. त्यामुळे बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे पाहायला बॅ. अंतुले आज असायला हवे होते, असेही ते म्हणाले. अंजुमन इस्लाम संस्थेच्या शैक्षणिक कामाबद्दल त्यांनी गौरवोद्गारही काढले. ‘जे.जे.’त शिकत असताना अंजुमन इस्लाम शाळा जवळून पाहत आलोय. त्यामुळे या शाळेचा शेजारी विद्यार्थी राहिलो आहे. म्हणूनच या शाळेतील कार्यक्रमास आवर्जून आलो, असेही ते म्हणाले. त्यामुळे ‘बाळासाहेबांचा मुलगा अंजुमन इस्लाम शाळेत काय करतो’ असा प्रश्न कुणाला पडू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, नवाब मलिक, उदय सामंत, जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, ऍड. माजीद मेमन, खासदार अरविंद सावंत, आमदार यामिनी जाधव, कपिल पाटील, रईस खान, आदिती तटकरे, गीतकार जावेद अख्तर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी आदी मान्यवर उपस्थित होते.


राजकारणापलीकडे मैत्री जपणारा माणूस! – शरद पवार
कठीण काळात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बॅ. अंतुले यांच्यावर जबाबदारी येऊन पडली होती. ते मुख्यमंत्री बनले तेव्हा मी विधिमंडळात विरोधी पक्षनेता होतो. सभागृहात आमचा रोज संघर्ष होत असे. मात्र या संघर्षानंतर आम्ही त्यांच्या दालनात एकत्र चहापान करायचो अशा आठवणी जागवत अंतुले यांच्या उदार व्यक्तिमत्त्वाचे पैलू शरद पवार यांनी उलगडले. शिवसेनाप्रमुख आणि अंतुले यांची घनिष्ठ आणि राजकारणापलीकडील मैत्रीही त्यांनी उलगडली. राजकारणापलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणजे बॅ. अंतुले, असे पवार म्हणाले.


विधी महाविद्यालयाला अंतुले यांचे नाव
अंजुमन ए इस्लाम येथे सुरू असणाऱया विधी महाविद्यालयाचे नामकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘बॅ. ए. आर. अंतुले कॉलेज ऑफ लॉ’ असे करण्यात आले. या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वाजवी दरात शिक्षण दिले जाते. शिवाय संपूर्ण शाळेत सुमारे 50 टक्के विद्यार्थी हिंदूंसह इतर भाषिक शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. हिंदू-मुस्लिम यांच्यातील हा बंधुभाव असल्याचे ते म्हणाले.


टेक्नॉलॉजी रोमान्सची दुष्मन – जावेद अख्तर
पत्राच्या माध्यमातून त्या काळात व्यक्त होणारी प्रेमभावना सुखद अनुभव देणारी होती. वाट पाहायला लावणारी होती. तो दुरावा अस्वस्थ करायला लावणारा होता. मात्र आता व्हॉटस्ऍप, एसएमएसए ई-मेलच्या जमान्यात हे सर्व काही आपण हरवून बसलो आहोत. टेक्नॉलॉजी ही रोमान्सची खरी दुष्मन आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केले.