प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड

 



कराड (राजसत्य) - माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. युवकच्या राष्ट्रीय.कार्यकारणीची बैठक दिल्ली येथे आज सकाळी पार पडली. युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. श्रीनिवास, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्या बैठकीत निवड जाहीर केली. श्री. मोरे सध्या सरचिटणीस म्हणून पाहत आहेत. त्यांचावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना राजकीय आदर्श मानून शिवराज मोरे यांनी विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक कार्याला सुरुवात केली. अल्पावधीत मोरे यांच्यावर युवक काँग्रेसच्या माध्यमातून देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून काम करताना विद्यार्थी काँग्रेस सोबत देशभरातील युवकांनासहभागी केले. त्यांनी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक,सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, पश्चीम बंगाल आदी राज्यात पक्ष संघटनेचे काम केले. 


काँग्रेसचे संघटन वाढवताना पक्षाला राजकीय यश मिळवून देण्यासाठी श्री. मोरे यांनी मेहनत केली आहे. फक्त क-हाड दक्षिण मतदारसंघा सोबतच त्यांना पक्षाने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत २०१७ साली सुमारे १२ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने शिवराज मोरे यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा एक युवक आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात आहे.


कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराचे तंत्रशुद्ध नियोजन करून बाबांच्या विजयात मोलाचा वाटा असणारा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून शिवराज मोरेंच्या नावाची ओळख झाली.पक्षासाठी युवकांचे केलेले संघटन व पक्षनिष्ठा लक्षात घेवून त्यांची पक्षाच्या युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पक्षाचे संघटन व त्यामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर शिवराज मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीला साजेसे काम करून पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.