कराड : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाअंतर्गत मलकापूर व कराड शहराच्या हद्दीच्या परिसरातील मलकापूर हद्दीतून कराड नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा कराडच्या हद्दीतून न घेता महामार्गाच्या कडेने थेट कोयना नदीपात्रात पाईपलाईनद्वारे करण्यात यावा. त्याबरोबरच नवीन सहापदरी रस्त्यामध्ये युटिलिटी पाईप टाकून द्याव्यात. ही कामे महामार्गाचे काम करणाऱया ठेकेदार कंपनीने करावीत अन्यथा कराड शहर हद्दीत महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
याबाबत राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यात म्हटले आहे की, कराडजवळ दक्षिणउत्तर दिशेने राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यामुळे कराड नगरपरिषदेच्या हद्दीचे दोन भाग झाला असून झाले असून बराच भाग महामार्गाच्या पश्चिम बाजूस आहे. पश्चिम बाजूस मोठय़ा प्रमाणात नागरी वसाहत असून नगरपरिषद या भागात विविध मूलभूत सुविधा पुरवत आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने या नागरी भागासाठी नागरी सुविधा पुरवण्यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पाणीपुरवठा, जलनि:सारण, सांडपाणी नि:सारण आदीसाठी युटिलिटी पाईपलाईन आताच टाकून देणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेच्या हाती लगत दक्षिण बाजूस मलकापूर नगरपरिषदेचे हद्द आहे. मलकापूर नगरपरिषदेचे हद्दीतून महामार्गाच्या पूर्व बाजूने संगम वाईन शॉपसमोरून जमिनीच्या उताराने मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी कराड नगर परिषदेच्या हद्दीत येते व तेथून ते कोयना नदीत मिसळते. मलकापूरमधून येणारे पाणी हे गटरमधून वाहत येते. या गटरचा आकार कमी असल्याने सदरचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्याचबरोबर नागरिकांच्या घरांमध्ये, दुकान गाळय़ांमध्ये शिरते. यामुळे येथील रहिवाशांच्या सतत नगरपालिकेकडे तक्रारी येत असतात.
मलकापूर हद्दीतून येणारे पाणी कराड नगरपरिषदेच्या हद्दीतून न घेता ते महामार्गाच्या पूर्व बाजूने उत्तरेस थेट कोयना नदी पात्रात पाईपलाईन टाकून निचरा केल्यास वरील सर्व समस्या मिटणार आहेत. याबाबत महामार्गाचे ठेकेदार अदानी ग्रुपचे प्रोजेक्ट मॅनेजर व डी. पी. जैन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक यांना समक्ष साइटवर नेऊन सदरच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कराड नगरपरिषदेच्या महामार्गाच्या पश्चिमेकडील नागरी वसाहतीसाठी मूलभूत सुविधा पुरवण्याकरता सहापदरीचे काम पूर्ण होण्याआधीच युटिलिटी पाईपलाईन्स महामार्ग विभागाकडून टाकून मिळाव्यात. त्याचबरोबर मलकापूर हद्दीतून सध्याच्या महामार्गाच्या पूर्व बाजूने कराड नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा नियोजित महामार्गाच्या पूर्व बाजूने उत्तर दिशेने थेट कोयना नदी पात्रात पाईपलाईन टाकून करण्याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीस शासनाकडून आदेश द्यावेत. हे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे.
चौपदरीवेळी झालेली चूक आता तरी सुधारा
कराड व मलकापूर हद्दीत 15 वर्षापूर्वी महामार्गाचे चौपदरीकरण करताना मलकापूर हद्दीतून कराडच्या हद्दीत येणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याबाबत लक्ष देण्यात आले नाही. परिणामी हे पाणी महामार्गाच्या कराड हद्दीत घुसून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. या चुकीची शिक्षा कराडकरांना भोगावी लागत आहे. त्यामुळे सहा पदरीकरण करताना या चुका दुरूस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील अनेक वर्षे कराडकरांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे, असे यादव यांनी सांगितले.
दुकानगाळय़ांची अन्यायकारक भाडेवाढ रद्द करा
तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळय़ांची अन्यायकारक भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे दुकानगाळय़ांची कोटय़वधी रूपयांची थकबाकी दिसत आहे. ही भाडेवाढ करताना नगरपालिकेचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतलेले नाही. शहरातील पालिकेच्या गाळेचालकांना ही भाडेवाढ भरणे अशक्य आहे. त्यामुळे नगरपालिकेचे म्हणणे ऐकून याबाबत पुनर्निणय द्यावा, अशी मागणी राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना केल्या आहेत.