कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू


कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत !


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू


ऐतिहासिक कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. असे खात्रीलायक समजते. मुख्याधिकारी यशवंत डांगे हे कोणाला नको आहेत ? आणि याबाबतचे कारण काय ? याचे उत्तर कराडकर नागरिकांना व नगरपालिका प्रशासनातील कर्मचार्‍यांना द्यावे लागेल. गत तीन वर्षांमध्ये मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कराड शहरासाठी केलेले काम हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. हे एका राजकीय गटाला नको आहे. कराड शहरातील आणि कराड शेजारील एका राजकीय व्यक्तीचा देखील यात हस्तक्षेप आहे.


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा कराडमध्ये तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत असताना शासनाच्या नगरविकास विभागाने त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना आणखी एक वर्ष मुदतवाढ दिली होती. दरम्यान ही मुदतवाढ रोखण्याचा प्रयत्न मंत्रालय पातळीवर सुरू असून यशवंत डांगे यांची बदली करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप सुरू असल्याचे वृत्त आहे. इतकेच काय तर राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा जणू विडाच उचलला गेला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी शासन निर्णयानुसार होत असतात. यात नावीन्य असे काहीच नाही.दरम्यान राज्य शासनाने एखाद्या अधिकार्‍याच्या उत्कृष्ट, चांगल्या, सकारात्मक कामाची दखल घेऊन जर मुदतवाढ दिली असेल तर राजकीय लोकांच्या पोटात गोळा का उठला ? याचे उत्तर मात्र मिळायलाच हवे.


मुख्याधिकारी यशवंत डांगे हे सप्टेंबर 2017 मध्ये कराडला मुख्याधिकारी म्हणून रूजू झाले. त्यानंतर डांगे यांनी 2018 आणि 2019 या दोन वर्षात कराड नगरपालिकेस केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या "स्वच्छ सर्वेक्षण"मध्ये चांगले यश मिळवून दिले होते. 2019 मध्ये कराड नगरपालिकेचा देश पातळीवर प्रथम क्रमांक आला. यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस नगरपालिकेस मिळाले आहे. 2020 सालच्या स्पर्धेचा निकाल प्रलंबित असून यातही कराड नगरपालिका देशपातळीवर बाजी मारण्याची शक्यता आहे. हे यश मिळवून देण्यात यशवंत डांगे यांचा सिंहाचा वाटा आहे.याचा विसर कराडकर नागरिकांना व कर्मचाऱ्यांना कदापि होणार नाही. कराड शहरात स्वच्छतेचे विविध उपक्रम त्यांनी रुजवले आणि "स्वच्छ व सुंदर कराड" मध्ये महत्त्वाचे काम केले आहे. या कामाची दखल घेत नगरविकास विभागाने त्यांना आणखी एक वर्षे कराडमध्ये काम करण्याची संधी देत मुदतवाढ दिली. 


गेल्या आठवड्यात नगरविकास विभागाने राज्यातील मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये यशवंत डांगे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही झाला. शासन निर्णयानुसार आदेश पारित झाला. हा आदेश जारी झाल्यानंतर कराड शहरात यशवंत डांगे यांच्या बदलीचे प्रयत्न सुरू झाले. मंत्रालय पातळीवर यशवंत डांगे यांची राजकीय दबावातून मुदतवाढ रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बदलीची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून यशवंत डांगे यांना बदलण्या इतपत काय घडले ? याचा खुलासा होणे आवश्यक आहे.अधिकाऱ्याची मुदत संपली त्याला हटवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तसेच दर पाच वर्षांनी याच लोकप्रतिनिधींना जनतेसमोर यायचे आहे. त्यावेळेला कराडकर नागरिक व नगरपालिकेचे कर्मचारी नक्की याचा विचार करतील. किंवा जाहीररीत्या जाब विचारतील.कराडकर नागरिकांना एखादी गोष्ट आवडली तर ते डोक्यावर घेतात आणि जर कराडकरांच्या विरोधात कृती झाली तर त्याला पायदळी तुडवतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे.


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मुदतवाढ मिळाल्याचे समाधान कराडकर नागरिकांनी व्यक्त केले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पेढे भरहून कौतुक केले.कराडमध्ये जी कामे अपुरी आहेत. ही कामे एका वर्षामध्ये पूर्ण होतील. अशी कराडकर नागरिकांना आशा निर्माण झाली होती. कराडकरांच्या आशा-आकांक्षावर पाणी फिरवण्याचे महापाप करणाऱ्या राजकीय लोकांचा हिशोब नक्कीच कराडकर भविष्यामध्ये करतील. तेव्हा सांगणे एवढेच आहे की, मुदतवाढ झाल्याचा आदेश रद्द करून पुन्हा बदली करण्याचा हालचाली सुरू असल्याने कराडकर नागरिक व नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यांची बदली होणार असेल तर त्यांना मुदतवाढ का दिली ? असा प्रश्न कराडकर उपस्थित करीत आहेत. घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त होत असून यात कराड शहरात सुरू असलेल्या राजकारणात मुख्याधिकाऱ्यांचा बळी जात असल्याचे बोलले जात आहे.


कराड शहरातील दीर्घकालीन परिणाम करणारे उपक्रम पूर्ण होण्यासाठी यशवंत डांगे यांची मुख्याधिकारी म्हणून अजून एक वर्ष गरज आहे. राजकीय हेवेदावे यातून जर यशवंत डांगे यांची बदली झाली तर मात्र कराडकर नागरिकांच्या व कर्मचार्‍यांच्या रोषाला संबंधित राजकीय लोकांना सामोरे जावे लागेल. तात्काळ अथवा भविष्यकाळात चांगल्या अधिकार्‍याची बदली करणाऱ्या, बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय व्यक्तींना याचा राजकीय तोटा होऊ शकतो. येणाऱ्या काही दिवसात काय होते ? हे पाहू.


गोरख तावरे


9326711721