सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा


सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा


कराड -  सातारा-पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांकडून आनवोडी टोल व्यवस्थापनाकडून विविध सोयी-सुविधांसाठी टोल घेण्यात येतो.  या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांना चांगल्या प्रकारे सोयी-सुविधा देऊन या महामार्गावर पडलेले खड्डे येत्या 15 मार्च पर्यंत बुजवा व  केलेल्या कामाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना द्या, अशा सक्त सूचना सहकार, पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांच्या कामाचा आढावा पालकमंत्री बो पाटील यांनी घेतला. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मरकंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीखक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.


महाबळेश्वर ते विटा या रस्त्याचे काम सुरु असून या कामाची गती  वाढवा, अशा सूचना करुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, काम सुरु असलेल्या सातारा ते रहिमतपूर रस्त्यावरील वाहन धारकांना धुरळ्याचा त्रास होऊ नये, यासाठी या रस्त्यावर पाणी मारावे. जिथे टोल वसुली केली जाते तेथील आसपासच्या 20 किलोमीटर अंतरावरील असणाऱ्या गावातील वाहनाधारकांना 100 टक्के टोल सुट कशी मिळेल यासाठीही प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.


टोल व्यवस्थापनाने वाहनधारकांना नियमाप्रमाणे सोयी-सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. सातारा-पुणे महामार्गावरील  लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे प्राधान्याने करा. पाचगणी-महाबळेश्वर-प्रतापगड हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.


सातारा-पुणे महामार्गावरील स्ट्रीट लाईट काही ठिकाणी बंद आहेत, त्या तात्काळ सुरु करा, असे सांगून आमदार मरकंद पाटील म्हणाले, महाबळेश्वर महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात. प्रत्येक पावसाळ्यात पाचगणी-महाबळेश्वर-प्रतापगड रस्ता खराब होत असतो, प्रत्येक वर्षी पावसाळ्यानंतर या रस्त्याची डाडुगजी करावी लागते या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग करावा.


जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची कामे घेणाऱ्या ठेकेदारांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची कामे कशा पद्धतीने करावी यासाठी कार्यशाळा घ्यावी, अशा सूचना आमदार महेश शिंदे यांनी केल्या.


या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.