प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


मुंबई - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदुषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडण्यात येणाऱ्या प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले.


कल्याण- डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायु प्रदुषणासंदर्भात सदस्य गणपत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.ठाकरे बोलत होते.


पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोणत्याही औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी हे प्रक्रिया होऊनच बाहेर सोडले जाणे सक्तीचे आहे. असे न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस जे अनधिकृतरित्या डंम्पींग करतात त्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.


याचबरोबर मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदुषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री ठाकरे म्हणाले,  या परिसरातील दोन कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यात कामगार काम करत असतात त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणा-या कंपन्यांनाच परवानगी देण्यात येते. तसेच, स्थानिक परिसरातून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांतून येणारे रासायनिक पाणी यावर प्रक्रिया करूनच हे पुढे जलस्त्रोतात सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मौजे शेलार भागात ७ हजार बेकायदेशीर इमारती होत्या. अनधिकृत इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नोटीस देऊनही जर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली.


यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रविंद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभु, रईस शेख, किसन कथोरे, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.