अतिरिक्त प्रवासभाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निर्देश


अतिरिक्त प्रवासभाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निर्देश


मुंबई  : राज्यात कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी वाहतूक सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे तेथे त्यानुसार त्वरित कार्यवाही करुन प्रवाशांची संभाव्य गैरसोय दुर करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. परंतु खाजगी बसेसकडून जर अधिकचे प्रवास भाडे घेण्यात येत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिले.


श्री. परब म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारीची उपाययोजना म्हणून काही खाजगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी  दिली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी  गावी जात आहेत. या काळात खाजगी बस सेवांनी  अधिकचे प्रवास भाडे घेतल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी बससेवांनी सामाजिक बांधिलकीतून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून  सहकार्य करावे असेही श्री. परब यांनी यावेळी संगितले


श्री. परब म्हणाले, राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकावरील बैठकव्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळा  सॅनिटायझरचा  योग्य वापर करून स्वच्छ केली जावी. तसेच बसस्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी  करून निर्जंतुक केला जावा, वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना, सँनिटरी लिक्विड एक बाटली देण्यात यावी, प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांना ती उपलब्ध करावी. याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी . तसेच बसस्थानकावरील उद्घघोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी कोरोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. अशा प्रकारे एसटी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे प्रवाशांनीही काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहनही श्री.परब यांनी केले आहे.