स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार


स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार


कराड - गड संवर्धन, स्वच्छता मोहिम यासह विविध सामाजिक कार्यात नेहमीच निस्वार्थ भावनेने अग्रेसर असणार्‍या कराडमधील शिवराय ट्रेकिंग ग्रुपने घारेवाडी (ता.कराड) येथील धुळोबा डोंगरावरील मंदिराचा स्वखर्चातून जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळेच आता पडझड झालेले, ऊन वारा आणि पाऊस झेलत गेली काही वर्षे उभ्या असलेल्या शंभू महादेव मंदिरास नवी झळाळी प्राप्‍त झाली असून लवकरच या मंदिरात महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे.


जिल्ह्यातील किल्ले सदाशिवगड, किल्ले वंदनगड येथे गड संवर्धनासाठी शिववंदनेश्‍वर प्रतिष्ठान आणि सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला हातभार लावणार्‍या शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांकडून धुळोबा डोंगर परिसरात ट्रेकिंग करताना तेथील शंभू महादेव मंदिराची विदारक अवस्था पहावयास मिळाली. त्यानंतर ग्रुपमधील सदस्यांनी बाहेरील कोणत्याही व्यक्‍तींची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार नोव्हेंंबर 2019 मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ करण्यात आला होता.


घारेवाडीतील शिवम् प्रतिष्ठानच्या केंद्रापासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर डोंगरावर हे मंदिर आहे. दोन किलोमीटरची डोंगरातील पायवाट तीन ते चार ठिकाणी खूपच अवघड आहे. शेवटच्या टप्प्यात तर एका माणसाला मोकळे व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळेच वीट, वाळू यासह अन्य साहित्य नेणे, एक प्रकारचे मोठे आव्हानच होते. हे आव्हान पेलण्यासाठी शिवराय ट्रेकिंग ग्रुपला एकलव्य अ‍ॅकॅडमी (कराड), शिवम् प्रतिष्ठानमध्ये अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी, (ओंड) गावातील युवकांसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मदत केली. त्याचबरोबर संजय बाबुराव घारे, शंकरराव खबाले यांनीही शिवराय ट्रेकिंग ग्रुपला मोलाची मदत केली आहे.


शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम करीत जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळेच आता धुळोबा डोंगरावरील शंभू महादेव मंदिरास नवी झळाळी प्राप्‍त झाली असून शिवराय ट्रेकिंग ग्रुपने निस्वार्थीपणे अथक परिश्रमाद्वारे आपल्या सामाजिक कार्याद्वारे एक नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपणार्‍या शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे विविध स्तरातून कौतूक होत आहे.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश