प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना....पोस्टामार्फत 8 हजार ग्राहकांना रक्कम वितरित - प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील

 


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना....पोस्टामार्फत 8 हजार ग्राहकांना रक्कम वितरित - प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील


कोल्हापूर :  लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर जिल्हयातील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना ग्रामीण डाक सेवक व पोस्टमनच्या माध्यमातून आज अखेर आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS ) द्वारे 7 हजार 919 ग्राहकांना 1 कोटी 47 लाखाचे विनामूल्य घरपोच वितरण करण्यात आले असल्याची माहिती डाकघर प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.


 लॉकडाऊनच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खात्यात जमा होणारी प्रतिमहिना 500 रुपयांची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही रक्कम पोस्टामार्फत संबंधित खातेदारांना घरपोच करण्याची सूचना केली होती, त्यानुसार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डाक विभागाने लॉकडाऊनच्या काळात पोस्ट ऑफिस आपल्या दारी ही योजना राबवून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांची सोय केली आहे. यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून ही भूमिका पार पडली असून जिल्हयातील छोट्या – छोट्या गावांमध्ये ग्रामीण डाक सेवक व पोस्टमनच्या माध्यमातून विनामूल्य घरपोच रक्कम देण्यात आली असून सध्या कोल्हापूर डाक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल असल्याचेही प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी स्पष्ट केले.


 लॉकडाऊनच्या काळातही पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये 237 तसेच ग्रामीण भागामध्ये 739 कर्मचारी कार्यरत असून ते खातेदारांना पोस्टाच्या व बॅंकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्हातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले असून AePS सेवेद्वारे इतर कुठल्याही बँकेच्या आधार लिंक खात्यातून (जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता) संबंधित खातेदारास आधार क्रमांक व अंगठ्याच्या ठशांद्वारे दिवसाला रु.१००००/- पर्यंत रक्कम काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्याकाळात कोल्हापूर डाक विभागामध्ये ८७ सब पोस्ट ऑफिसेस व ग्रामीण भागातील ४३५ ब्रंच पोस्ट ऑफिसेस कार्यरत असून या काळात पोस्टाच्या खातेदारांनी आजअखेर १०० कोटी पेक्षा जास्त रक्क्म पोस्ट ऑफिस मध्ये जमा केली आहे व पोस्ट ऑफिस मार्फत २२ कोटी पेक्षा जास्त रक्कम खातेदारांना अदा केली आहे. 


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बँकात होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पोस्टाकडे पाठविण्यासंदर्भात आदेशित केले असून त्यानुसार आतापर्यंत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी बँकांनी सुमारे ३ लाख लाभार्थ्यांची माहिती पोस्टाकडे दिली आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम घरपोच पोहोचविण्याचे काम पोस्टाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. यात बँक खात्याला आधार लिंक नसणे ही एक अडचण ठरत असून लॉकडाऊनच्या काळात आज अखेर पोस्ट ऑफिस  ३६२४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले परंतु त्यापैकी २२८२२ लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याने त्यांना ह्यासेवेचा लाभ घेता आला नाही, तरी देखील सर्व ग्रामीण डाक सेवक/ पोस्टमन व इतर कर्मचारी मोठ्या उमेदीने लोकांपर्यंत पोहचून हा लाभ देण्याचा  प्रयत्न असून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी केले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात डाक विभागाचे 6 उपविभाग असून उपविभागनिहाय हे काम सुरु आहे. या  काळात इतर बँकेच्या लाभार्थ्यांबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 2 हजार 924 ग्राहकांना 54 लाख 51 हजार रुपयांचे वितरण व 4 हजार 567 ग्राहकांकडून 91 लाख 16 हजार रुपये जमा (Deposits) करण्यात आले आहेत असून फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट इ. सेवाही  पुरविण्यात आल्याचेही श्री. पाटील म्हणाले.