"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील


 


 "काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील


कराड - सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सदिच्छा भेट झाली असून यावेळी पक्ष बांधणीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार गोरख तावरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना दिली.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्री सतेज पाटील यांनी सातारा येथे माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या सातारा येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. वृत्तपत्रात विविध प्रकारच्या बातम्या आल्या. सातारा जिल्ह्याच्या आणि विशेषता कराड दक्षिणच्या राजकीय पटलावर पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्या भेटीच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा सुरू झाली.


राज्याचे गृहराज्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे सातारा संपर्क नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पुढाकार घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील यांच्यामध्ये समेट करून भेट घडवून आणला याबाबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. त्याचबरोबर सध्या लॉकडाऊनचा कालावधी असल्यामुळे लॉकडाऊननंतर काँग्रेसचा संयुक्त मेळावा आणि प्रत्येक तालुक्यात ब्लॉक कमिटीच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. पक्ष बांधणीसाठी ब्लॉक कमिट्यांची पुनर्बांधणी तसेच तालुकानिहाय आढावा घेऊन काँग्रेस भक्कम, सक्षम करण्याचा प्रयत्न जाणार आहेत. असेही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.


गृहराज्यमंत्री सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले, विलासकाका काही दिवसांपूर्वी आजारी होते. पृथ्वीराजबाबानी विलासकाकांना भेटण्याची इच्छा प्रकट केली. यानुसार सदर भेट झाली. या भेटीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील पक्ष बांधणी संदर्भाच्या विविध अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. पृथ्वीराजबाबानी विलासकाकांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटी दरम्यान विलासकाकांचे सुपुत्र उदयसिंह पाटील उपस्थित होते. या भेटीत सातारा जिल्ह्यात वैभवशाली परंपरा असलेल्या काँग्रेसला पुन्हा भरभराटीचे दिवस यावेत, या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी प्रयत्न करावेत, असे ठरले आहे. त्यास विलासकाका यांनी संमती दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पुनर्बांधणीवर यापुढे भर दिला जाणार आहे.