कराड नगरपालिकेचे राजकारण तसे नेहमीच चर्चेत असते ते विविध कारणांनी. कारण कोणतेही असो, चर्चा तर होणारच.याप्रमाणे कराड नगरपालिकेच्या राजकारणाची अनेकांना आवड आहे. डाव-प्रतिडाव, आरोप-प्रत्यारोप हे तर ठरलेलेच असते. विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व खेळी करून लोकशाही आघाडीने स्थायी समितीचे सदस्यपद मिळविल्यामुळे राजकीय खेळीत लोकशाही आघाडी आघाडीवर असल्याचे यावेळी दिसून आले. जनशक्ती आघाडी १६, लोकशाही आघाडी ६ भाजप ५ अशी सदस्य संख्या रीतसर निवडणूक झाल्यानंतर गट किंवा आघाडी म्हणून अधिकृतपणे तीस दिवसांमध्ये नोंद असलेली सदस्य संख्या आहे.या संख्याबळाचा विचार करून अथवा अधिकृतपणे नोंद असणाऱ्या संख्येनुसार पीठासन अधिकारी निर्णय घेतात.
कराड नगरपालिकेच्या झालेल्या विषय समितीच्या सभापती निवडीमध्ये जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांना सभापती म्हणून काम करण्याची संधी अधिक मिळणे हे स्वाभाविक आहे. यानुसार विविध समित्यांच्या सभापतींची निवड झाली आहे.दरम्यान गेल्या तीन वर्षांमध्ये स्थायी समितीचे सदस्य म्हणून ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर कार्यरत होते. यावेळी अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर यांना भाजपच्यावतीने स्थायी समितीचे सदस्य म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दगाफटका झाला की काय ? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. कारण स्थायी समितीच्या सदस्यपदी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. लोकशाही आघाडीची सदस्य संख्या सहा व भाजपची सदस्य संख्या पाच असल्यामुळे सौरभ पाटील यांना स्थायी समितीचे सदस्यपद मिळालेले आहे.
नगरपालिकेच्या राजकारणात स्थायी समिती ही अत्यंत महत्त्वाची व प्रभावी कार्य करणारी समिती आहे. या समितीचे सदस्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे समितीमध्ये सदस्यत्व आपल्याला मिळावे, यासाठी अनेक वेळेला वेगवेगळे प्रयत्न केला जातो.विशेषता स्थायी समितीमध्ये प्रत्येक विषयाचा सांगोपांग विचार होऊन स्थायी समितीमध्ये विषयाला मंजूर दिल्यानंतर तो विषय सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जातो. स्थायी समिती सदस्य प्रत्येक विषयावर बारीक-सारीक चर्चा करून निर्णय घेतात आणि याची पुढील कार्यवाही, मंजुरीसाठी तो विषय सर्वसाधारण सभेपुढे जातो.गेल्या तीन वर्षापासून सौरभ पाटील हे लोकशाही आघाडीचे विरोधी गटनेते म्हणून कराड नगरपालिकेच्या राजकारणात कार्यरत आहेत.
सौरभ पाटील पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यानंतर त्यांना विरोधामध्ये काम करण्याचा प्रसंग उद्भवला. वास्तविक विरोधात बसून बरेच काही शिकता येईल, हा विचार करून सौरभ पाटील यांनी नगरपालिकेच्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. आणि सकारात्मक कामांना पाठिंबा देणे हे धोरण अवलंबिले. विरोधासाठी विरोध करायचा नाही, हा पायाच मुळात कराड नगरपालिका राजकारणाचा आहे.आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी कराड नगरपालिका राजकारणामध्ये अनेक आदर्श घालून दिले आहेत. आदर्श पाय वाटेने वाटचाल केल्यानंतर कराड नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवता येतात, चांगले काम करता येते, हे पी. डी. पाटीलसाहेब यांनी करून दाखविला आहे. याच आपल्या आजोबांच्या पायवाटेने कराड नगरपालिकेच्या राजकारणात वाटचाल करायची, या हेतूने सौरभ पाटील हे कराड नगरपालिका राजकारणात उतरले.
तीन वर्षांमध्ये विरोधात असताना त्रयस्थपणे नगरपालिकेचा कारभार चालतो कसा ? प्रत्येक विषयाची गांभीर्य पाहून त्याचा अभ्यास करून सभागृहांमध्ये आपले मत मांडण्याचा प्रयत्न सौरभ पाटील यांनी केला आहे. स्थायी समितीचे सदस्यपद सौरभ पाटील यांना मिळाल्यानंतर आता ते कराडच्या विकास कामांमध्ये अधिकृतपणे सहभाग घेऊ शकतात.याचा अर्थ गेल्या तीन वर्षांमध्ये केवळ सभागृहांमध्ये त्यांना मत मांडण्याचा अधिकार होता. स्थायी समितीचे सदस्यपद मिळाल्यामुळे आता स्थायी समिती बरोबरच नगरपालिकेच्या सभागृहात एखाद्या विषयाचे सविस्तर विश्लेषण अथवा एखादा विषय कराड शहराच्या प्रगतीसाठी कसा आवश्यक आहे, हे सर्व सदस्यांना म्हणजे सभागृहाला पटवून देऊ शकतात.
कराड नगरपालिका राजकारणामध्ये लोकशाही आघाडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कराड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये नेहमीच लोकशाही आघाडी आघाडीवर राहिलेली आहे.सौरभ पाटील यांना स्थायी समितीचे सदस्यपद मिळाल्यामुळे पुढील दोन वर्षामध्ये सौरभ पाटील नाविन्यपूर्ण काम करू शकतात अथवा विकास कामांसाठी महत्त्वाच्या सूचना करू शकतात.भाजपाला स्थायी समितीचे सदस्यपद कायदेशीररित्या देता येणार नाही, अशी भूमिका पीठासन अधिकारी यांनी घेतल्यानंतर भाजपच्या स्थानिक सदस्यांनी जो थयथयाट केला, तो अशोभनीय आहे. गत कालावधीमध्ये लोकशाही आघाडीलाच खऱ्या अर्थाने स्थायी समितीचे सदस्यपद मिळणे आवश्यक होते. मात्र तत्कालीन परिस्थितीत त्यांना ते मिळाले नाही. म्हणून त्यांनी फारसा कलकलाट केला नाही. योग्य वेळेची संधी पाहून आता लोकशाही आघाडीला स्थायी समिती सदस्यपद मिळाले आहे. यानंतर भाजपच्या स्थानिक सदस्यांनी उगाच बाऊ करणे योग्य नाही.