कराड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेरीस १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान बहुतांश सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणाऱ्या समर्थकांनी सर्वाधिक अर्ज भरले आहेत.आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला आहे. त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या वैचारिक पायवाटेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत.प्रतीथयश व सहकार क्षेत्रात सकारात्मक काम करणाऱ्या "सह्याद्री" सहकारी साखर कारखान्यामध्ये आपणाला संचालक म्हणून काम करण्यास संधी मिळावी, अशी अनेक उमेदवारांची अपेक्षा आहे. दरम्यान एकूण 21 उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाणार आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून आपणास संधी मिळावी, यासाठी प्रत्येक गटातून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी बाळासाहेब पाटील यांची मनधरणी केली जात आहे. कराड - गट क्रमांक १ मधून १५, तळबीड - गट क्रमांक २ मधून २५, उंब्रज - गट क्रमांक 3 मधून २४, कोपर्डे हवेली गट क्रमांक ४ मधून२६, मसूर - गट क्रमांक ५ मधून २५, वाठार किरोली - गट क्रमांक ६ मधून २८, महिला राखीव १०, अनुसूचित जाती जमाती ६, भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती ३, इतर मागास प्रवर्ग ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वास्तविक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे नेहमी बेरजेचे राजकारण करीत असतात. यामुळे अधिकाधिक लोकांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सभासदांच्या हिताला प्रथम प्राधान्य व संचालक मंडळाने विश्वस्त म्हणून काम करावे, या एकाच हेतूने नामदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी कारखान्याचा कार्यभार करीत असतात.
सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० जानेवारीपर्यंत १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह महिला राखीव, अनुसूचित जाती - जमाती, भटक्या विमुक्त जाती -जमाती, इतर मागास प्रवर्ग यातून हे संचालक निवडले जाणार आहेत. कराड, तळबीड, मसूर आणि वाठार किरोली या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत. तर उंब्रज, कोपर्डे हवेली या गटातून प्रत्येकी दोन संचालक निवडले जाणार आहेत. तसेच महिला राखीव गटातून दोन महिला संचालकांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा नामदार बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करता यावे अशी अपेक्षा वाढलेली आहे. यासाठी कार्यकर्ते सातत्याने नामदार बाळासाहेब पाटील यांना भेटून आम्हाला आपल्याबरोबर काम करण्यास संधी द्यावी असे साकडे घालत आहेत.
उमेदवारी अर्जांची १३ जानेवारी रोजी छाननी होणार असून १४ ते २८ जानेवारी अखेर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण २१ संचालकांची निवड होणार आहे दरम्यान १६७ अर्ज दाखल झाले असले तरी १४६ उमेदवारांचे अर्ज मागे आल्यानंतर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल. प्रत्येक गटामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद नेहमी आदरणीय स्वर्गीय पी. डी .पाटीलसाहेब यांच्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना काम करण्याची व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्तास्थाने त्यांच्याकडे सोपवीत असतात.नामदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी सह्याद्री कारखान्याचे सभासद ठामपणे उभे राहिलेला असतो.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा राजकारण विरहित असतो. हे सभासदांना ठाऊक आहे. कारण सहकार क्षेत्रामध्ये काम करताना नामदार बाळासाहेब पाटील हे कोणत्याही प्रकारचे राजकारण सभासदांच्या हिताआड येऊ देत नाहीत.
गोरख तावरे
9326711721