पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख

पत्रकारांच्यावर हल्ले होणे हे नेहमीचेच झाले होते.दररोज महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे पत्रकारांच्यावर हल्ले अथवा वर्तमानपत्राच्या कार्यालयाची तोडफोड होत होती. यामुळे राज्यातील पत्रकार असुरक्षिततेच्या भावनेनेमध्ये वावरत असताना पत्रकारांना संरक्षण मिळाले पाहिजे, पत्रकारांसाठी संरक्षण कायदा झाला पाहिजे, यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख यांनी राज्यस्तरावर मोहीम उघडून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, संपादक व वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेक घटकांना सहभागी करून घेऊन शासनस्तरावर कायदा करण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला होता. राज्यातील कोठेही पत्रकारांच्यावर हल्ला झाला तर, प्रत्येक तालुकास्तरावरून या घटनेचा निषेध केला जात होता. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून एस.एम. देशमुख यांनी "बातमीदार" म्हणून वेबपोर्टल सुरू केले होते. यावर सदर हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात येत होती. 


संरक्षण कायदा करावि अशी मागणी सातत्याने केली जात होती.राज्य शासनाकडे पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करून वेळप्रसंगी विविध प्रकारची आंदोलने केली गेले आहेत. या आंदोलनांमध्ये राज्यातील पत्रकारांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून राज्यमंत्र्यांनीपर्यंत त्याचबरोबर आमदार, खासदार यांना प्रत्यक्ष भेटून पत्रकार संरक्षण कायद्याची गरज प्रत्येकाला समजावून सांगितली जात होती. निवेदन दिले जात होते आणि पत्रकारांचा संरक्षण कायदा करण्यासाठी आपण आपल्या पातळीवर प्रयत्न करावा, अशी लोकप्रतिनिधींना विनंती केली जात होती. राज्यामध्ये पत्रकारांच्यावर एका वर्षांमध्ये झालेल्या हल्ल्यांची संख्या व त्याचे गांभीर्य विविध निवेदनाद्वारे शासनाकडे सादर केलेले आहेत. या सर्वांची दखल घेऊन राज्य शासनाने "पत्रकार संरक्षण कायदा" मंजूर केला आहे. नुकताच अंतिम मसुद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे.पत्रकार संरक्षण कायदा करण्यापूर्वी अनेक पातळ्यांवर याबाबत चर्चा करण्यात आली. 


विशेष म्हणजे पत्रकार कोणाला म्हणायचे ? इथून सुरुवात झाली होती, कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रिंटर मीडिया त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सध्या प्रभावीपणे काम करणारी सोशल मीडियामध्ये पत्रकार आहेत. त्यामुळे पत्रकार कोणाला म्हणायचे ? याची व्याख्या करावी, अशी प्रारंभी चर्चा झाली.मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रात डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. डॉक्टरांनी राज्य शासनाकडे मागणी करून स्वतंत्र कायदा करून डॉक्टरांना संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. याची तात्काळ दखल घेऊन राज्य शासनाने डॉक्टरांसाठी स्वतंत्र कायदा केला.या कायद्याला ज्याप्रमाणे शासनाने तात्काळ मंजूरी दिली. त्याप्रमाणे पत्रकारांना संरक्षण असणारा कायदा करण्यासाठी पत्रकार संघटनांना लढा द्यावा लागला. मराठी पत्रकार परिषदेचे एस. एम. देशमुख यांनी पुढाकार घेऊन अनेक संघटनांना आपल्याबरोबर घेऊन राज्य शासनावर दबाव आणून आंदोलने करून पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे. याची पूर्ण जाण व जाणीव महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना आहे. 


एस. एम. देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेले योगदान हे कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. कारण पत्रकारांना संरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी प्रथमता एस. एम. देशमुख यांनी आवाज उठवला. लढा दिला, लोकशाही मार्गाने राज्यस्तरावर, तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर आंदोलन केले. या सर्वांची दखल घेऊन अखेर राज्य शासनाला "पत्रकार संरक्षण कायदा" करावा लागला. याचे श्रेय निर्विवादपणे एस. एम. देशमुख यांना द्यावे लागेल. त्याचबरोबर मराठी पत्रकार परिषदेच्या या लढ्यासाठी अनेक पत्रकार संघटना यामध्ये सहभागी झाल्या, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.दरम्यान पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक म्हणून एस. एम. देशमुख यांचा उल्लेख केला तर अतिशयोक्ती होणार नाही. एस. एम. देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी घेतलेले परिश्रमाचे अखेर चीज झाले. यामुळे या कायद्यासाठी एस. एम. देशमुख यांचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. आणि पत्रकारांचे नेते म्हणून पत्रकारांनी एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.


मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांची मातृसंस्था आहे. या मातृ संस्थेचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ संपादक व जेष्ठ पत्रकार यांनी भूषविलेले आहे.महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य संख्या असणारी मराठी पत्रकार परिषद असून तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत संघटनेची चांगल्याप्रकारे बांधणी करण्यात आलेली आहे.पत्रकारिता क्षेत्रांमध्ये येणारा नवोदित पत्रकार हा प्रथमता मराठी पत्रकार परिषदेचा सदस्य होतो. आणि आपल्या पत्रकारितेचा श्रीगणेशा करतो.अनेक वादळातून, संघर्षातून मराठी पत्रकार परिषद उभी राहिली आहे. याचा फार मोठा इतिहास अनेक पत्रकारांना माहित नाही. मात्र सध्या मराठी पत्रकार परिषद राज्यामध्ये अग्रक्रमावर आहे. ती केवळ एस. एम. देशमुख यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हे मान्यच करावे लागेल.


गोरख तावरे, 
कराड.