३० डिसेंबरला सुखद धक्का ....विधानभवनात आमदार बाळासाहेब पाटील गेले कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन नामदार होऊन बाहेर आले


                               (गोरख तावरे)


महाराष्ट्र विधानभवन परिसरामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कराड उत्तर बरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात आला. मंत्रीपदाची शपथ घेऊन आमदार बाळासाहेब पाटील हे नामदार म्हणून विधान भवनाच्या बाहेर आल्यानंतर कराड उत्तर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व बाळासाहेब पाटील यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अक्षरशा जल्लोष केला. अभिनंदन व शुभेच्छा देणाऱ्या हितचिंतकांनी बाळासाहेब पाटील यांना क्षणाचाही उसंत न देता, हार, पुष्पगुच्छ, पेढ्यांचा हार देवून सत्कार करण्यात येत होता. इतकेच काय संतोष वेताळ यांनी तर गदा देऊन अभिनंदन केले. यासह अनेकांनी हस्तांदोलन करीत बाळासाहेब पाटील यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.


राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी सरकार निर्माण झाले आहे. या महाविकास आघाडी सरकारमध्ये कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. मंत्रिपदाच्या शपथ क्रमांक यादीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा 18 वा क्रमांक होता. आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शांत संयमी स्वभावानुसार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.विशेष म्हणजे शपथविधीला जाण्यापूर्वी बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेले. बाळासाहेबांना पाहताच शरद पवार म्हणाले, अहो इकडे का आलाय ? शपथ घ्यायला तिकडे जायचे आहे, यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले, साहेब तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. हे बोलताच शरद पवार म्हणाले, बाळासाहेब आज पी.डी. पाटील हवे होते, कारण त्यांनी मला कधी काहीही मागितले नाही. ही आठवण बाळासाहेबांना सांगताना दोघे ही हळवे झाले होते.


आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी नेहमीच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण केली. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची केले.कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करताना आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी कधीही सत्तेचा अहंभाव मनी बाळगला नाही. त्याचबरोबर आमदार म्हणून काम करताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्याकडे सूत्रे असताना, मला मंत्री करा ! अथवा व्यक्तिगत काही द्या, असे कधीही पी. डी. पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली नाही. आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पी. डी. पाटील साहेबांची आठवण बाळासाहेबांना करून दिली. शरद पवार यांच्याकडून पी. डी. पाटील यांची आठवण ऐकताच क्षणी बाळासाहेब भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यासमोर आदरणीय पी. डी.पाटीलसाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या.


विधान भवनातून शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रत्येक मंत्री विधानभवनाच्या बाहेर आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आनंद व उत्साहाने घोषणा देत होते. असाच प्रकार बाळासाहेब पाटील यांच्याबाबतही घडला. मीडियाशी बोलून प्रत्येक मंत्री कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात मग्न होते. दरम्यान सगळ्यांपेक्षा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण काही घटना घडल्या ते बाळासाहेब पाटील यांच्याबाबत.चहुबाजूनी बाळासाहेब पाटील यांना कार्यकर्त्यांनी घेरले, ते त्यांना केवळ शुभेच्छा देण्यासाठीच. हार, पुष्पगुच्छ, शाल देऊन प्रत्येक कार्यकर्ता अभिनंदन करून सत्कार करीत होता. सातारी कंदी पेढ्यांचा हार घालूनही बाळासाहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला. इतकेच काय संतोष वेताळ यांनी तर गदा देऊनच बाळासाहेब पाटील यांचा विधानभवनाच्या समोरील कार्यकर्त्यांच्या गराड्यातच सत्कार केला.उत्साही कार्यकर्त्यांना रोखण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्ते इतके उत्साही झाले होते की, एक वेळ आपला चेहरा बाळासाहेबांना दिसावा, त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करावे आणि मंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे, इतकीच अपेक्षा ठेवून मुंबईमध्ये कार्यकर्ते जमा झाले होते.हसतमुखाने प्रत्येक कार्यकर्त्यांचे नावाचा उल्लेख करून बाळासाहेब पाटील मनापासुन सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते.


बाळासाहेब पाटील आमदार होतेच, परंतु नामदार झाल्यानंतर मुंबई येथे बहुसंख्येने आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांना संवाद साधायचा होता, काही केल्या संवाद होत नव्हता. अखेर विधानभवनाच्या समोरील रस्त्याकडेला असणाऱ्या झाडाच्या पारंबीला धरून छोट्याशा कठड्यावर नामदार बाळासाहेब पाटील उभे राहिले आणि सर्वांना शांततेचे आवाहन केले.दोन्ही हात जोडून कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि पहिले वाक्य उच्चारले ते "तुमची गैरसोय झाली असेल, तर मला क्षमा करा" म्हणताच कार्यकर्त्यांनी नाय... नाय.. म्हणत बाळासाहेबांचे संवाद ऐकू लागले. शपथविधीसाठी सर्वांनाच विधानभवनाच्या परिसरात येता आले नाही. याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानुसार आणि आदरणीय स्वर्गीय पी. डी.पाटीलसाहेब यांनी ज्या विचारानी राजकारण केले त्यापद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कराड उत्तरची जनता नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली. यामुळे पाचव्यांदा निवडून आलो.राष्ट्रीवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मला काम करण्याची संधी दिली. कराड उत्तरच्या जनतेचे आभार मानतो.कार्यकर्त्यांनी शिस्तीत परत आपल्या गावी जावे. मी आल्यानंतर तुम्हाला निश्चित भेटतो. असे कार्यकर्त्यांना आश्वासित केल्यानंतर बाळासाहेब पाटील कॅबिनेट मंत्रिपदाच्या बैठकीसाठी मंत्रालयाकडे गेले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे मंत्रालयात आल्यानंतर त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघून गेले. यानंतर ज्या ज्या मंत्र्यांनी शपथविधी झाला, ते मंत्री मंत्रालयात येण्यास प्रारंभ झाला होता. नामदार बाळासाहेब पाटील मंत्रालयाच्या प्रांगणात आले, मुख्य दरवाजातून आत येताच मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी "चला बैठकीला" म्हणून बाळासाहेब पाटील यांना लिफ्टपर्यंत घेऊन गेले. सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ बैठकीत नामदार बाळासाहेब बैठकीत सहभागी झाले. नामदार बाळासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री म्हणून सहभाग घेतला.मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात येऊन अजितदादा पवार व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर चर्चा केली. यानंतर मंत्रालयामध्ये शुभेच्छा देणारांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. कराडचे आम्ही पत्रकार म्हणजेच गोरख तावरे, सचिन देशमुख, देवदास मुळे यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्रीपदाच्या भविष्यकाळातील व सध्या नव्याने पडलेल्या जबाबदारीबाबत चर्चा केली. म्हणूनच सदर लेखाच्या प्रारंभी म्हटले आहे. 30 डिसेंबरला आक्रीत घडले. नामदार बाळासाहेब पाटील व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दृष्टीने 30 डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक, राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने मैलाचा दगड अथवा टर्निंग पॉइंट ठरला आहे.