नवीन भाजी मंडई पडते अपुरी....... कराडमधील भाजी व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये वादावादी होत आहे.......उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी पाहणी करून काढला मार्ग


नवीन भाजी मंडई पडते अपुरी....... कराडमधील भाजी व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये वादावादी होत आहे.......उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी पाहणी करून काढला मार्ग


कराड - नवीन भाजी मंडईमध्ये शेतमाल विक्री करणार्‍या विक्रेते आणि शेतकरी यांच्यातील वाद गुरुवारी आठवडी बाजार दिवशी विकोपाला जाऊन तो नगरपालिकेत पोचला. शेतकरी भाजी विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या परिसरात सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर नगरपालिकेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे यांनी भाजी मंडईत पाहणी करून शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून न देता, नवीन भाजी मंडईतच जागा दिली जाईल असे सांगितले.


कराड नगरपरिषदेने गुरुवार पेठ, नवीन भाजी मंडईची इमारत बांधली आहे. या इमारतीतील तळमजल्यावरील गाळ्यांचा लिलाव झाला आहे. मंडईच्या मध्यभागात बाजार कट्टे असून सुमारे दोनशे शेतकरी कट्ट्यांवर बसतील इतकी जागा उपलब्ध आहे. मात्र भाजी विक्रेत्यांनी येथील अतिरिक्त जागा व्यापल्याने शेतकऱ्यांना भाजी विक्री करण्यास पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग नगरपालिका इमारतीसमोर व महात्मा फुले पुतळा परिसरात गुरुवारी व रविवारी आठवडा बाजार दिवशी शेतमाल विक्रीकरीता बसत आहेत. सध्या स्वच्छ सर्वेक्षणच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास मनाई करून त्यांना मंडईत जागा उपलब्ध करून दिली आहे. नवीन मंडईतील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी इथेच शेतमाल विक्रीसाठी बसावे अशी मागणी होती. त्यामुळे नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन मंडईत शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.


गुरुवारी आठवडा बाजार असल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसह भाजी विक्रेत्यांना नवीन मंडईत कट्टे देऊन त्याठिकाणी भाजी विक्रीसाठी बसवले होते. उर्वरित शेतकऱ्यांना त्याच परिसरातील जागा देण्यात आले होते. मात्र काही विक्रेत्यांनी मंडईत न बसता पुन्हा रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अन्य शेतकरीही रस्त्यावर बसण्यासाठी निघून आले. यातून शेतकऱ्यांना बसण्यास जागा मिळत नसल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी नगरपालिका इमारतीसमोर रास्तारोको केला. त्यानंतर ते सर्वजण नगरपालिकेत दाखल झाले. मुख्याधिकारी यशवंत डांगे नगरपालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकरी विक्रेते व महिलांशी चर्चा केली. नगरपालिका अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यापाठोपाठ नवीन मंडईतील भाजीविक्रेते व्यापारीही पालिकेत दाखल झाले. त्यांनीही आपल्या मागण्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नगरपालिकेत दाखल झाल्यानंतर कादीर मुल्ला यांनी याबाबत चर्चा केली. भाजी विक्रेत्यांना कट्ट्यावर बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. उर्वरित शेतकऱ्यांना ही जागा देण्यात येईल. त्यामुळे रस्त्यावर कोणालाही बसून देऊ नये, अशी भूमिका भाजी व्यापाऱ्यांनी मांडली. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याशिवाय भाजी विक्रीचा व्यवसाय चालणार नाही असे सांगितले. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे यांनी नवीन भाजी मंडईची पाहणी केली. शेतकऱ्यांना बसण्यासाठी नवीन मंडईमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित शेतकरी नगरपालिका इमारतीच्या उत्तर आणि दक्षिण बाजूस बसविले जातील. यातून जे शेतकरी राहतील त्यांना रस्त्यावर बसू दिले जाईल असे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी सांगितले. मात्र नवीन मंडई सोडून शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास परवानगी देणार नाही असे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगितले.