नेत्रविकारांबाबत भावी पिढीला जागरुक करणे आवश्यक - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई - भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरुक करण्यासाठी नेत्रविकार तज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपालांच्या हस्ते ‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॉलमोलॉजी’ (आय जे ओ) ला 60 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने राजभवन येथे टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
राज्यपाल म्हणाले की, ही संस्था डोळयांच्या विकारांवर संशोधन करते ही बाब कौतुकास्पद आहे. संशोधनामुळे भावी पिढीला त्याचा उपयोग होत असतो. संशोधन करणे हे सर्वांत कठिण काम आहे. यापुढेही जगभरात देशाचे नाव मोठे होईल यासाठी संशोधन व्हावे अशी आशा यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली.
यावेळी ऑल इंडिया ऑप्थॉलमोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महिपाल सचदेव, डॉ. एस नटराजन, डॉ. बरुन नायक, आय जे ओ चे संपादक डॉ. संतोष होनावार तसेच मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफ महाराष्ट्र एच. सी. अग्रवाल उपस्थित होते.