नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आकृतीबंध सुधारित करून बळकटीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार संचालनालयाच्या २७४ पदांच्या प्रचलित आकृतीबंधातील १३८ पदे निरसित करून ५५० पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. या आकृतीबंधानुसार १०८ पदे मुख्यालय स्तरावर, ११७ पदे विभागीय स्तरावर आणि ३२५ पदे जिल्हास्तरावर असतील. सहआयुक्त व उपायुक्त या वरिष्ठ पदावर संचालनालय व मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल.
राज्यात सध्या २४० नगरपरिषदा व १२९ नगरपंचायती अशा एकूम ३६९ नागरी स्थानिक संस्था कार्यरत असून, नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत या संस्थांचे संनियंत्रण करण्यात येते. यामध्ये गुणात्मक सुधारणा होण्यासाठी बळकटीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.