गतवर्षापेक्षा अधिक कोयना धरणातून वीज निर्मिती होणार
राज्याच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होणार
महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील विक्रमी अतिवृष्टीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 547.812 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती झाली आहे. वीज निर्मितीसह सिंचनाची गरज भागवतानाच जादा वीज निर्मितीमुळे राज्याच्या तिजोरीत अतिरिक्त महसुली उत्पन्न जमा होणार आहे.
1 हजार 960 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला कोयना जलविद्युत प्रकल्प, पश्चिमेकडील पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा या तीन प्रकल्पातून 1 हजार 920 मेगावॉट वीज निर्मिती होते. त्याचवेळी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणार्या पाण्यावर धरणाच्या पायथा वीजगृहातून 40 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. यावर्षी आत्तापर्यंत पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 38.90 टीएमसी पाण्याचा वापर करून 1 हजार 840.831 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. तर गेल्यावर्षी 26.76 टीएमसी पाण्यावर 1 हजार 252.655 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पश्चिमेकडे 12.14 टीएमसी ज्यादा पाणी वापरून त्यातून तब्बल 588.176 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती करण्यात कोयना धरण व्यवस्थापनास यश आले आहे.
पूर्वेकडे सिंचनासाठी किंवा पावसाळ्यात महापुरावेळी अतिरिक्त पाणी सोडण्यात येते. त्या पाण्यावर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वीज गृहातून वीज निर्मिती करून ते पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येते. चालूवर्षी ज्यादा पाऊस व आत्तापर्यंत सिंचनासाठी कमी पाण्याची गरज भासल्याने येथे सिंचनासाठी 6.64 तर पूर काळातील 9.79 अशा एकूण 16.73 टीएमसी पाण्यावर 75.166 दशलक्ष वीज निर्मिती करण्यात आली.
एकूणच 547.812 दशलक्ष युनिट जादा विजेची कोयना धरणातील पाण्यामुळे झाली आहे. एकूण वीज निर्मितीचा विचार करता यावर्षी या चारही टप्यातून 55.28 टीएमसी पाण्यावर 1 हजार 916.007 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. त्याचवेळी गतवर्षी 51.10 टीएमसी पाण्यावर 1 हजार 368.195 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली होती. त्यामुळे पूर्वेपेक्षा धरणाच्या पश्चिमेकडील पाण्याचा अतिरिक्त केवळ 4.18 टीएमसीचा वापर होऊनही तुलनात्मक वीज निर्मिती ही तब्बल 547.812 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी पश्चिमेकडील पाणी वापर हा राज्याच्या सार्वत्रिक हिताचाच ठरतो, हे पुन्हा एकदा यावर्षी झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे समोर आले आहे.
कोयना धरणात सध्या तब्बल 81.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच आता जून महिन्यापर्यंत सिंचनासह वीजनिर्मिती करून सुमारे 19 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष जून ते मे या कालावधीत गणले जाते. मागील वर्षी विक्रमी अतिवृष्टीमुळे कोयना धरणात 1 जूनपासून तब्बल 240.57 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी असल्याने धरणात आलेल्या पाण्याचा कोणताही वापर न करता थेट कोयना नदीत तब्बल 112.43 टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले होते.
एकीकडे अशी स्थिती असताना पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 38.90 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. तर पूर्वेकडे सिंचनासाठी 6.64 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. वीज निर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित आहे. त्यामुळे चार महिन्यांसाठी अजूनही 28.60 टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करणे कोयना धरण व्यवस्थापनास सहजशक्य आहे.
तर दुसरीकडे सिंचनासाठी 36 टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे सिंचनासाठीही तब्बल 29.36 टीएमसी पाणी वापरता येणे सहजशक्य आहे. एकूणच यापुढे चार महिन्यात वीज निर्मितीसाठी 28.60 टीएमसी तर सिंचनासाठी 29.36 टीएमसी पाणी वापरले तरी सुमारे 57 टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. तर कोयना धरणाचा मृत पाणीसाठी 5 टीएमसी इतका असून तो लक्षात घेता 62.96 टीएमसी पाणी वापरणे सहजशक्य आहे. त्यामुळेच जून महिन्यात कोयना धरणात सुमारे 19 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.