महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी असून महामंडळाच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 45 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, समाजामध्ये महिलांनी शिक्षणाच्या बळावर खूप प्रगती केली आहे. शिक्षणाची सुरुवात प्रत्येक घरात आईपासून होत असते. आईने चांगले संस्कार, चांगले शिक्षण दिल्यामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत. महिला आर्थिक विकास महामंडळातील (माविम) शहरी व ग्रामीण भागातील महिलांचे काम उत्कृष्ट आहे. महाराष्ट्र हे देशातील आगळे वेगळे राज्य असून विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. चोहोबाजूंनी विकासाच्या दिशेने महाराष्ट्र सतत पुढे जात आहे. महिला म्हणजे ‘वुमन’. याच महिलांचे मन जाणून घेऊन त्यांना योग्य दिशा दिली तर त्या नक्की आपल्या क्षेत्रात प्रगती करु शकतात. यासाठी त्यांना शासनातर्फे सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिला.


विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, आजचा ‘माविम’चा कार्यक्रम सुत्रबद्ध आणि भविष्याची दिशा देणारा कार्यक्रम असून यामुळे महामंडळाला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्यात प्लास्टिक बंदीच्या काळात महिला आर्थिक विकास महामंडळाकडे कागदी व कापडी पिशव्या बनविण्याची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी उत्तमपणे पार पाडली. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट व महिला सक्षमीकरण यांचे जवळचे नाते आहे. हे यातून दिसून येते. ‘माविम’ आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील राहिले आहे. महिला बचतगटाचे काम करताना ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग यांचेसुद्धा बचतगट आहेत. यांच्याबरोबरच माविमचे महिला बचतगट आज पुढे जात आहेत व आपले नवनवीन उत्पादने बाजारात आणत आहेत. भविष्यातही माविमची प्रगतीकडे वाटचाल अशीच सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळास नियोजन विभागाकडून सन 2018-19 या वर्षात 31 कोटी 3 लाख निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा महामंडळाने उपयोग करुन घ्यावा व आपल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून मंडळाचा नावलौकिक वाढवावा. राज्य सरकारच्या विविध विभागांना ज्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचे उत्पादन महामंडळाने करावे, अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या. महिला महामंडळावर आमचा सर्वांचा विश्वास असून त्यांना शासनातर्फे जे कर्ज दिले जाते त्याची वेळेत परतफेड त्यांच्याकडून होत असते. महिला शक्तीवर आमचा विश्वास असून, त्या कष्टाळू व मेहनती आहेत. त्याबद्दल श्री.पवार यांनी महिलांचे अभिनंदन केले.


महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात म्हणाले, महिला बचतगटाची चळवळ ही फार जुनी असून आज बचतगट मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. महिला जसे कुटुंब चांगले सांभाळू शकतात तसाच ते देशही सांभाळू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातील उत्पादनाच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवून महामंडळाचे उत्पादन वाढवावेत. त्यासाठी महिलांना संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर म्हणाल्या, विभागीय स्तरावर महिला बालकल्याणासाठी युनिट सुरु केले तर महिला अधिक सक्षमपणे काम करु शकतील.


महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असून स्‍वयंसहाय्य बचतगटाच्‍या माध्‍यमातून महिला सक्षमीकरणाचे काम ‘माविम’ आजतागायत करीत असले, तरी राज्यातील प्रत्येक महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांची शिखर संस्था म्हणून ‘माविम’ कटिबद्ध आहे, असे माविमच्या अध्यक्षा ज्‍योती ठाकरे यांनी सांगितले.


यावेळी राज्यातील ‘माविम’ स्थापित बचत गटातील महिलांच्या प्रेरणादायी कन्यांना ‘तेजस्विनी कन्या’ या पुरस्काराने  गौरविण्यात आले.  तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्री सक्षीमकरणासाठी भरीव योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘तेजश्री फायनान्शीअल सर्व्हिसेस’ या महिलांकरीताच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. योजना ही नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांची असून ‘माविम’ मार्फत राज्यात राबविण्यात येणार आहे यासाठी माविमला एकूण रु. ६८.५८ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी या वित्तीय वर्षाकरीता पहिला हप्ता रु. ३१ कोटी 3 लाख रुपयांचा निधी हस्तांतरित करण्यात आला.


या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सचिव आय.ए. कुंदन, अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.


तेजस्वीनी कन्या नेहा गजभिये, नागपूर, संध्या हटकर, नांदेड, जयश्री आहेर, नाशिक, प्रतिक्षा निमकर, अमरावती, प्रियंका लोखंडे, पुणे, माधवी पाटिल, पालघर या माविम स्थापित बचत गटातील महिलांच्या प्रेरणादायी कन्यांना ‘तेजस्विनी कन्या’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्री सक्षमीकरणात भरीव योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिला चित्रा उबाळे-डिक्की. ज्योती म्हापसेकर-स्त्री मुक्ती संघटना, रुबिना शहा, स्वाती वैद्य, रेवती निकम या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.