चहा नव्हे अमृततुल्य, कराडच्या युवकांचा अभिनव उपक्रम......शिवनेरी अमृततुल्य
उच्च शिक्षा विभूषित झाल्यानंतर नोकरीच केली पाहिजे हा अठ्ठाहास मनी न बाळगता, स्वकर्तृत्वावर वेगळेपणाने व्यवसाय करून यश मिळवण्याचा नवीन फंडा कराड तालुक्यातील युवकांनी स्वकर्तृत्वाने तयार केला आहे. कराड तालुक्यातसह सातारा जिल्ह्यात या नवकल्पनाकार युवकांच्या अभिनव उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे. कोणताही व्यवसाय करताना त्यामध्ये वेगळेपण शोधून ग्राहकांना आपलेसे करून व्यवसाय वृद्धि कशा पद्धतीने वाढवावा, असा आदर्श निर्माण केला आहे. चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर चहा विक्री करून यशस्वी उद्योग कसा होतो ? याचा आदर्श कराडच्या तरुणांनी समाजासमोर ठेवला आहे. सकाळी उठले की प्रथम प्रत्येकाला हवा असतो तो चहा आता "चहा"ची जागा अमृततुल्य नावाने घेतली आहे.
अमृततुल्य चा व्यवसाय राज्यभर सुरू करण्याचा मनोदय या तरुणांचा आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अमृततुल्यची नवीन शाखा सुरू केली जाईल, त्या अमृततूल्य शाखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे नाव देण्याचा उपक्रम गौरवास्पद व अभिमानास्पद असाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये युवक आदर्श निर्माण करीत आहेत.दरम्यान आपण जो अमृततुल्य चा व्यवसाय निवडला तो विस्तारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या नाव देण्याचा उपक्रम हा खरंच मराठी मनाला आनंद देणारा आहे.
मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, असा शिक्का बसलाय असे आता म्हणता येणार नाही. कारण मराठी माणसावर अकर्तुत्वाचा बसलेला हा शिक्का पुसण्याचे काम अनेक मराठी तरुण करताहेत. हे आशावादी चित्र आहे. अशा तरूणांचेच प्रतिनिधी म्हणून कराड तालुक्यातील सुशांत शेवाळे, निखिल शिंदे, व्यंकटेश थोरात या तिघांनी ओळख निर्माण केली आहे.व्यवसाय लहान की मोठा हा भेदभाव न करता व्यवसायाशी एकनिष्ठता ठेवल्यानंतर नक्कीच त्यामध्ये यश मिळते. पैसे मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातील आपणाला आवडेल तोच मार्ग शोधला पाहिजे. आणि असाच मार्ग सुशांत, निखिल व वेंकटेश यांनी शोधला. आणि शिवनेरी अमृततुलचा श्रीगणेशा सुरू केला. "चहाची टपरी" ऐवजी आता "अमृततुल्य" चा असा नवीन शब्दप्रयोग होत आहे.
उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना नवीन उद्योगात पदार्पण करणे हे धाडसाचेच काम आहे. दोन वर्षापूर्वी या उच्च शिक्षित तीन तरूणांनी "शिवनेरी अमृततुल्य" नावाने चहा सुरू केला. चहाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह होईल की नाही ? हा विचार न करता "शिवनेरी अमृतुल्य"ला नावलौकिक मिळवून देऊन चहाची गोडी अधिक मधुरपणे लोकांच्या जिभेवर अधिकचा गोडवा निर्माण करेल अशा दर्जेदार चहा निर्माण केला. कराडच्या शाहू चौकात सुरू झालेल्या या चहाने बघता बघता कराडकरांच्या जीभेला चटक लावली. आणि प्रत्येक कराडकर उठला की प्रथम शिवनेरी अमृततुल्य चहाची चव चाखतो. नेहमीच्या मानसिकतेनुसार या तिघांनाही "हे आपले काम नाही तुम्ही नोकरी करा" असा सल्ला देण्यात आला. वास्तविक पाहता सल्ला देणार्यांचा हेतू चांगलाच होता कारण नवीन व्यवसाय सुरुवात करून तो स्थिरस्थावर करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कष्ट करताना या युवकांना पाहिले की, खरेच हातामध्ये घेतलेले काम इमानेइतबारे केले तर यश नक्की मिळते. हे निसंशयपणे मान्य करावे लागेल. चहाचा व्यवसाय करताना या तिघाजणांच्या चेहरयावर समाधान झळकत असते. ते पाहून अनेकांनी सल्ले देणे बंद केले. कष्टाला प्रामाणिकपणाची जोड मिळाली तर यश आपलेच असते हे सुशांत शेवाळे, निखिल शिंदे, व्यंकटेश थोरात यांनी सिद्ध केले आहे.व्यवसायाच्या विविध व्याख्या आहेत. मात्र व्याख्येच्या पलीकडे जाऊन विचार केला तर कोणताही व्यवसाय सर्वश्रेष्ठ ठरू शकतो, हे मात्र निश्चित.
शिवनेरी अमृततुल्यला कराडकरांनी पसंती दिल्यानंतर शिवनेरी अमृततुल्य आता राज्यभर पोहचण्यासाठी हे तरुण सज्ज झाले आहेत. खारघर, चेंबूर, पुणे, मुरगूड (कोल्हापूर) अशा ठिकाणी फ्रान्चाईसी सुरू झालेल्या आहेत. हे म्हणजे "पाऊल पडते पुढे" असेच म्हणावे लागेल. अनेक तरूण शिवनेरी अमृततुल्यसोबत व्यवसाय सुरु करून आपले उद्योगातील पहिले पाऊल टाकू पहाताहेत. प्रस्थापित चहाच्या ब्रॅडच्या तोडीचा किंबहुना त्यापेक्षा सरस चहा म्हणून शिवनेरीची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योगात येणारया मराठी तरुणांसाठी सुशांत शेवाळे, निखिल शिंदे आणि व्यंकटेश थोरात हे तिघे आयडाॅल ठरत आहेत.