सहकारी संस्थांची शासकीय थकहमी गोळा करण्याचे काम सुरु- बाळासाहेब पाटील


सहकारी संस्थांची शासकीय थकहमी गोळा करण्याचे काम सुरु- बाळासाहेब पाटील


मुंबई सहकारी साखर कारखाने, सुत गिरण्या, कृषीप्रक्रिया संस्था यांना दिलेली शासकीय थकहमी व कर्ज यांची वसुली करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना दिली.


श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान महत्वाचे आहे. सहकार चळवळीला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सहकारी संस्थांना शासकीय भाग भांडवल, शासकीय कर्ज, शासकीय हमी शासनाकडून दिली जाते. ही थकहमी गोळा करण्याचे काम सुरु आहे. विविध सहकारी संस्थांकडून विहित रक्कम वसुल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी आतापर्यंत 11 हजार 339 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाले आहे. उर्वरित रक्कमही लवकरच जमा करण्याची कारवाई सुरु आहे. शेतकऱी व सहकारी संस्थांबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचनांची शासन दखल घेईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.