शेतकर्‍यांनी एकत्रित उत्पादक कंपनी स्थापन करावी - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील


शेतकर्‍यांनी एकत्रित उत्पादक कंपनी स्थापन करावी - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील


कराड - राज्य शासन शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. बाजारपेठेत अनेकदा शेतकर्‍यांची पिळवणूक होते. त्यामुळेच शेतकर्‍यांनी एकत्रित येत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


कोपर्डे हवेली (ता.कराड) येथील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कृषी संगम शेतकरी उत्पादक कंपनी व आरोग्य उपकेंद्रच्या नुतनीकरण इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सभापती मानसिंगराव जगदाळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, शंकरराव चव्हाण, माजी संचालक बळवंतराव चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती सुहास बोराटे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, मागील वेळच्या सरकारने कर्जमाफी करताना शेतकर्‍यांचा छळ केला. कर्जमाफी न देण्याकडे सरकारचा कल होता. महाविकास आघाडीच्या सरकारने एका क्लिकवर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. नियमित कर्ज भरणार्‍याना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्यात आले आहे. जिल्ह्यामधील 29 हजार 530 शेतकर्‍यांना 257 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याची कार्यवाही सुरू आहे, असे ना. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


यावेळी मानसिंगराव जगदाळे, आर. एम. मुल्ला, महादेव बरडकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. सरपंच मेघा होवाळ, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, नेताजी चव्हाण यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.