'कोरोना'चा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सज्ज


'कोरोना'चा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सज्ज

 

कराड : जगभर थैमान घातलेल्या कोरोना साथीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा स्थितीत भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवल्यास या कोरोनाचा सामना करण्यासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल सज्ज झाले आहे.कृष्णा हॉस्पिटलने एकूण 60 बेडचे 2 क्वारंटाईन आणि 2 आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून, याठिकाणी तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ तैनात केला असल्याची माहिती कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.

 

कोरोना साथीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीबद्दल अधिक माहिती देताना डॉ. भोसले म्हणाले, की कृष्णा हॉस्पिटल हे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातून येथे उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येतात. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर अशावेळी आपल्या भागातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे 4 स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. ज्यामध्ये 25 बेड पुरुषांसाठी, 25 बेड महिलांसाठी आणि 10 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 

 

याठिकाणी स्वतंत्र 'आयसीयु' आणि व्हेंटिलेटरचीही सोय उपलब्ध आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये 40 व्हेंटिलेटर उपलब्ध असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर असणारे जिल्ह्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. कोरोना ही जागतिक आपत्ती असून या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच डॉक्टर्स, कर्मचारी आपले रुग्णसेवेचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करत आहेत. या अनुषंगाने 'कोरोना'चा सामना कृष्णा हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर, नर्स आणि अन्य पॅरामेडिकल स्टाफ तैनात ठेवण्यात आला असल्याची माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

 

...तर 'कोरोना'च्या टेस्ट इथेच शक्य!

 

सध्या पुणे, मुंबई आणि नागपूर इथेच कोरोनाचा चाचण्या केल्या जात आहेत. पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये 'एनएबीएल' मानांकित 2 रोगनिदान प्रयोगशाळा असून, सरकारने परवानगी दिल्यास इथेच संशयित रुग्णांच्या 'कोरोना'विषयक टेस्ट करणे शक्य होणार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.