चुकीचा मार्ग नको

 


चुकीचा मार्ग नको

आजच्या युवकाला कशाचे आकर्षण आहे ? त्याला नक्की काय हवे आहे ? यासाठी त्याने कोणत्या मार्गाने जाणे गरजेचे आहे ? याबाबत समाजामध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. युवकांचा वाढता कल कुठल्या बाजूला आहे ? का आहे ? कशामुळे युवक तिकडे आकर्षित झाले आहेत ? याचा सांगोपांग विचार केला पाहिजे. वास्तविक युवकाला वाटणाऱ्या वाटेनेच जाता आले पाहिजे. मात्र तो मार्ग चुकीचा असता उपयोगाचा नाही. एवढी दक्षता घेण्यासाठी समाज व पालक जागृत असले पाहिजेत.शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळवण्याच्या नादात आणि सिने कलाकारांच्या आकर्षक पिळदार शरीराप्रमाणे आपले शरीर करण्याच्या नादामध्ये युवावर्ग उत्तेजित द्रव्यच्या आहारी जात असल्याच्या घटना निदर्शनास येत असल्यामुळे उत्तेजित द्रव्य विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासन कायदा करणार आहे. पिळदार शरीर बनविण्यासाठी स्टेरॉईडचे अतिसेवन करून मृत्युस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो फिनॉल आणि स्टिरॉईड या उत्तेजीत द्रव्यांच्या ऑनलाईन आणि दुकानात विक्री करणेस प्रतिबंधासंदर्भात नवीन कायदा करणार आहे. राज्यात व्यायामशाळेत पूरक आहाराच्या माध्यमातून स्टेरॉईडचे घटक असलेले पदार्थ किंवा उत्तेजक घटक वितरीत केले जाते. वजन वाढणे किंवा कमी करणेसाठी ही द्रव्ये दिली जातात. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक तसेच पोलीस अधिकारी यांच्यासमवेत राज्यातील सर्व व्यायामशाळेची तपासणी पुढील सहा महिन्यात करण्यात येणार आहे. अशा प्रकारची घटना आढळल्यास संबंधित व्यायाम शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शरीर वाढीसाठी, गर्भपातासाठीची औषधे, स्टिरॉईड, डायनायट्रोफिनॉल, अमिनो अँसिड, गिलेटीनपावडरचे घटक असलेले औषध यांचा गैरवापर तसेच ऑनलाईन खरेदी - विक्री यासर्वांवर कायदेशीर बंदी आणून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक विचार करीत असून उत्पादक आणि विक्रीसंदर्भात अधिक कडक तरतुदी करण्यात येणार आहेत.चुकीच्या मार्गाने जीवनात यशस्वी होता येत नाही. यामुळे युवावर्गाला मार्गदर्शन होणे अत्यावश्यक आहे. उत्तेजक पदार्थ घेऊन ना शरीर चांगले होते, ना जीवन सुस्थितीत होते. चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर जीवनात निराशा व्यतिरिक्त काहीच येत नाही याचाही विचार केला गेला पाहिजे.