सातारा ते कागल सहापदरीकरण कामाला गती येणार.....कराड येथे उड्डाणपूल मंजुरीला हिरवा कंदील....कराड तालुका शिवसेनेच्या प्रयत्नांला यश

 


सातारा ते कागल सहापदरीकरण कामाला गती येणार.....कराड येथे उड्डाणपूल मंजुरीला हिरवा कंदील....कराड तालुका शिवसेनेच्या प्रयत्नांला यश


कराड  - सातारा ते कागल सहापदरी करणाअंतर्गत मलकापूर व कराड शहर हद्दीतील कराड जंक्शन येथील 3.63 किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपुलाच्या कामाला आता गती प्राप्त होणार आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. शेंद्रे ते कागल सहापदरीकरणा अंतर्गत कराड जंक्शनचा उड्डाणपूल मंजूर व्हावा, प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी म्हणून शिवसेना कराड तालुका, कराडकर व मलकापूर नागरिकांच्यावतीने शिवसेना कराड तालुका प्रमुख नितीन काशीद यांनी 3 जुलै 2015 रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर उड्डाणपुलाबाबत प्रस्ताव दाखल केला होता अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये कराड येथे देण्यात आली.


यावेळी शिवसेना कराड तालुका प्रमुख नितीन काशीद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, कराड शहर प्रमुख शशिराज करपे, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, उपशहरप्रमुख सूर्यकांत मानकर, कराड उपशहर प्रमुख अक्षय गवळी, उपतालुकाप्रमुख संजय चव्हाण उपस्थित होते.


मंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथे सदर जागेची पाहणी केली
होती. सदर प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन पालकमंत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली, कोल्हापूर, पुणे कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. 5 जानेवारी 2017 रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण दिल्ली यांनी कराड येथे येथे उड्डाणपूल मंजूर करून त्याचा सहापदरीकरण योजनेत समावेश केला व सदर पुलाचे आराखडे नकाशे बनवण्याचे काम करण्यास लुईस बर्गर ग्रुप या कंपनीची नियुक्ती करण्यात आली. सदर ठिकाणी 18 कॉलमवर आधारित अस्तित्व असलेल्या उड्डाणपुलाच्या शेजारी दुसरा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु 4 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नवीदिल्ली) यांनी व्यापक प्रमाणात सहापदरी करण्याची योजना तयार केली. योजनेत प्रस्तावित पुलाचे डिझाईन बदलून पूल पंकज हॉटेल ते ग्रीनलँड हॉटेल मलकापूर हद्दीपर्यंत असा 3.63 किलोमीटर लांबीचा व सहापदरी करण्यात येणार असल्याचे लेखी पत्राने कळवले.


उड्डाणपुलाचे व सर्विस रोडचे डिझाईन पाठवून दिले व सदर पुलाची निविदा लवकर काढण्यात येणार असल्याचे कळविले होते. परंतु निविदा वारंवार पुढे ढकलण्यात आली याबाबत विचारण्यात आल्यानंतर रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे 2004 ते 2022 पर्यंत चौपदरीकरणाच्या कामाची देखभाल व दुरुस्ती व टोल वसुलीचे एग्रीमेंट असल्याने या तांत्रिक कारणाने सहापदरी करण्याची उड्डाणपुलाची निविदा स्थगित होत असल्याचे निदर्शनास आले. 23 डिसेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना सविस्तर पत्र लिहून सहापदरी योजनेची निविदा व कराड जंक्शन येथे उड्डाणपुलाचे काम चालू करावे अशी विनंती करण्यात आली.


2 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्री नितीन गडकरी यांनी प्रोजेक्ट मॅनेजर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर, पुणे यांना सदर प्रकल्पाची रखडण्याची कारणे नमूद करून त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट मॅनेजर (कोल्हापूर) यांनी 4 मार्च 2020 रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा या हद्दीतून जाणाऱ्या शेंद्रे ते कागल या सहापदरी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी भूसंपादन नुकसान भरपाई आराखडे व या प्रकल्पास होणारी दिरंगाई याबाबत सविस्तर अहवाल गडकरी यांना सादर केला आहे.


प्रकल्पाची तयारी पूर्ण झाली असून नुकसान भरपाई अदा करण्यापर्यंत पूर्तता केली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पाला दिरंगाई होण्याचे एकमेव कारण म्हणजे सदर निविदा मे 2019 रोजी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नवीदिल्ली) यांनी स्थगित केल्याचे नमूद केले आहे. मंत्री गडकरी यांनी अहवालातील बाबी तपासून निविदा प्रक्रिया चालू करण्याविषयी योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती शिवसेना कराड तालुक्याच्यावतीने करण्यात आली आहे