जनतेने संयम पाळून संपर्क साधावा...शासनाच्या सूचनांचे पालन करावे... पालकमंत्री बाळासाहेब पाटील


जनतेने संयम पाळून संपर्क साधावा...शासनाच्या सूचनांचे पालन करावे... पालकमंत्री बाळासाहेब पाटील


कराड - संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसमुळे अघोषित असे कोरोनाशी युद्ध सुरू आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी स्वतःवर नियंत्रण राखून लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वेळी सातारा जिल्ह्यातील जनतेने संयम पाळून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधींची संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. सहकारमंत्री असल्यामुळे राज्यातून लोक भेटायला येतात. निदान 31 मार्चपर्यंत लोकांनी लेखी सूचना कराव्यात असेही त्यांनी सांगितले.


केंद्र व राज्य सरकार सध्या देशातील कोरोना वायरस थोपविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. महाराष्ट्रात नागरी भागात 144 कलम लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळून इतर गोष्टी 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. ही उपाययोजना असून जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. आपापल्या घरी थांबून शक्यतो कोरोना व्हायरसशी संपर्क येवू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सुदैवाने सातारा जिल्ह्यातील अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणा दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी आपल्या परीवारापासुन दुर आहेत. 


त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गक्रमण करणे ही जनतेची जबाबदारी आहे. काल सायंकाळी पाच वाजता घंटानाद केल्यानंतर काही सुशिक्षित वर्ग घोळक्याने रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करीत होता. यामुळे लोकांचा संपर्क आला असून असे पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनेक लोक नियमितपणे भेटत असतात, त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात. सध्या कराड याठिकाणी घर व कार्यालय येथे लोक भेटण्यासाठी येतात. आवश्यक बाबी तसेच अत्यावश्यक सेवा देणे हे सरकारचे काम आहे. परंतु काहीजण हे सुरक्षित अंतर न ठेवता किंबहुना मास्क अथवा सेनेटायझरचा वापर न करता कार्यालयात येतात. त्यामुळे याठिकाणी आलेल्या लोकांना ही बाब खटकू लागली आहे. सर्वांनीच सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. अशा आरोग्यबाबतच्या सूचना आहेत.


सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा सक्षमरित्या आपली जबाबदारी पार पाडत असून सातारकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. लोकांनी संयम राखून आपल्या घरातूनच कोरोना व्हायरविरुद्ध लढाई लढली पाहिजे. बाहेर फिरण्याचा मोह टाळणे, हेच मोठे शस्त्र आहे. त्याचा आता वापर झाला पाहिजे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, ज्यांना आपली कामे व्हावीत असे वाटत आहे, त्यांनी लेखी स्वरूपात आपले निवेदन, सूचना, प्रस्ताव सादर करावा.व्यक्तीशा त्याची पडताळणी केली जाणार आहे. सध्या प्रत्येकाच्या भावना तीव्र असल्या तरी सार्वजनिक ठिकाणी जाणे आपल्या व इतरांच्या आरोग्यास योग्य नसल्याने आता लोकप्रतिनिधीही सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळले आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार लोकांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.