जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण सामाजिक दुरी सर्वांनी पाळावी : मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक दूरी सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक सर्व मदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था खंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे.
भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविद-19 या विषाणूचे चाचणी केंद्र विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला 150 चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता 1000 पर्यंत वाढविता येते. या चाचणी केंद्रासोबतच करोनाबाधितांसाठी 70 खाटांचे विलगीकरण कक्ष आणि 10 खाटांचे अतिदक्षता केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची पाहणी श्री. देशमुख यांनी केली.