कोरोनाच्या दक्षतेमुळे कराडमधील उपोषण-आंदोलन स्थगित


कोरोनाच्या दक्षतेमुळे कराडमधील उपोषण-आंदोलन स्थगित


कराड - कोरोनाच्या दक्षतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे उपोषण, कर्मचारी संघटनांचे बेमुदत बंद आंदोलन, आरोग्य समितीचे सभापती महेश कांबळे यांचे उपोषण पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे स्थगित करण्यात आले आहे.


अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कर्मचारी संघटनेने बेमुदत बंद पुकारला होता तर नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्याचबरोबर आरोग्य समितीचे सभापती महेश कांबळे यांनी नागरिकांना सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संबंधाने आंदोलन, उपोषण, गर्दी, यात्रा, जत्रा यावर बंदी घातल्यामुळे पोलिसांनी कोणालाही परवानगी न दिल्यामुळे तिन्ही आंदोलने स्थगित करण्यात आली आहेत.


नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, कर्मचाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी घरगुती प्रश्न असल्यामुळे ते घरातच राहू दे. त्यांच्या अनेक मागण्यांच्यावर चर्चा झाली असून लवकरच निर्णय घेत आहोत. मी पुकारलेले उपोषण कोरोनोच्या कारणास्तव स्थगित करीत असून पुढील काळात ते केले जाईल. असेही नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सांगितले. कराड नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने पोलिसांना पत्र देऊन आम्ही आंदोलन स्थगित करीत असल्याचे कळविले आहे.


दरम्यान कराड शहरातील सिनेमागृह, व्यायाम शाळा, खाजगी क्लासेस, स्विमिंग पूल बंद करण्यात आले असून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या जनहितार्थ चर्चेनुसार उपोषण मागे घ्यावे असे पत्र मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना दिले आहे.