करोनाची भीती अर्थव्यवस्थेची स्थिती

करोनाची भीती अर्थव्यवस्थेची स्थिती

 

 मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे व जागतिकरणा सारख्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. जगातील कोणत्याही देशात एखादी घटना घडल्यानंतर तत्काळ त्या घटनेचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसतात. जसे पाण्याच्या डोहात दगड टाकला असता पाण्यामध्ये तरंग निर्माण होऊन ते किनाऱ्यापर्यंत पोहोचतात पाण्यात टाकलेला दगड आकाराने जेवढा मोठा तेवढे तरंग अधिक निर्माण होऊन वेगाने किनार्‍यावर पोचतात  त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही देशात कोणतीही घटना घडल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगभरात पसरतात मग ती घटना नैसर्गिक, मानवनिर्मित, आर्थिक अथवा पर्यावरणाशी संबंधित असो किंवा करोना सारख्या विषाणूजन्य आजाराची असो. आज करोनामुळे संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली आहे कारण या आजारावरील 100% उपचार पद्धती अद्याप उपलब्ध नाही. या आजारावरील उपचार शोधणे हे जगभरातील संशोधका पुढील एक आव्हान आहे.

 

जगभरातील लोक या आजारामुळे भयभीत झाले असून त्यापासून बचाव करण्यासाठी दक्षता म्हणून घराबाहेर न पडणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हस्तांदोलन न करणे, नोकरी व कामाच्या ठिकाणी न जाणे, तसेच शाळा-कॉलेजात न जाणे, यासारख्या उपायोजना स्वतः करत आहेत. अतिदक्षतेच्या  ठिकाणी त्या त्या देशातील व राज्यातील सरकार शक्तीचे आदेश काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा व करोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. करोना मुळे जागतिक बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला असून जगाच्या अर्थव्यवस्थेवर विघातक असे परिणाम झाले आहेत. विशेष म्हणजे, करोना येण्याअगोदरच जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती समाधान कारक नव्हते. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने मार्गक्रमण करत होत्या. ते संकट विस्तारत असतानाच करोना हे नवीन संकट येऊन धडकले. या रोगाची लागण सर्वप्रथम सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या व अनेक देशांशी व्यापारी संबंध असलेल्या चीन या देशातून झाली. त्यामुळे जागतिक बाजारातील मागणी पुरवठा, उत्पादन प्रक्रिया व आयात निर्यातीवर गंभीर परिणाम होऊन करोना च्या साथी बरोबरच जगातील शेअर बाजार कोसळले, तेलाचे भाव कमी झाले, वाहतूक व्यवसाय थांबला, चित्रपट गृह मोकळी पडली, विमानतळे व बाजार ओस पडली, शाळा कॉलेज बंद केली, देवाचि मंदिरे ओसाड पडली, गावोगावच्या यात्रा बंद केल्या त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले परिणामी अनेक देशातील जीडीपी दर घसरु लागले त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था तीव्र मंदीच्या दिशेने वाटचाल करू लागली या आर्थिक संकटातून कोणताही देश वाचेल असे वाटत नाही. असे असले तरी सध्याची परिस्थिती ही आर्थिक संकटा पेक्षाही करोना च्या संकटाला धीराने सामोरे जाण्याची गरज आहे कारण शीर सही तो पगडी पचास म्हणजेच आज माणसं वाचवणे गरजेचे आहे माणसं वाचल्यास आर्थिक स्थिती सुधारता येऊ शकते.

 

भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असून आर्थिक जगतातही भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या संकटाकडे भारताने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे कारण चीनमधील वाढत्या लोकसंख्येमुळे चुकीची आहार पद्धती वाढीस लागल्यामुळे हे संकट उद्भवल्याचे बोलले जाते अर्थात चीनच्या तुलनेत भारताची लोकसंख्या वाढीचा दर सध्या अधिक असला तरी भारताची आहार पद्धती चीनच्या तुलनेत अत्यंत चांगली आहे असेच म्हणावे लागेल विशेष बाब ही की काही लोकांचे म्हणणे असे आहे की,करोना हा विषाणू प्रयोगशाळेत निर्माण केला गेला असून तो एक जैविक युद्धाचा भाग आहे  असे बोलले जाते.

 

हा विषाणू निर्माण होण्याचे कारण नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो या विषाणूने जगभरात अनेक लोकांचा बळी घेतलेला आहे. एकट्या चीन या देशात आजवर 3176 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील या रोगाची लागण झालेली काही रुग्ण आढळून आले आहेत परंतु हे सर्व रुग्ण इतर देशातून प्रवास करून आले असून इतर देशात असतानाच या आजाराची लागण त्यांना झालेली असल्याचे स्पष्ट  झाले आहे. असे असले तरी देशात करोना या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून देशातील केंद्रशासन व राज्य शासन योग्य ती काळजी घेत आहेत देशातील जनतेने देखील घाबरून न जाता स्वतःची दक्षता घेऊन इतरांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.

 

                  डॉ. ए. बी. मुळीक

                  मो.9637485794