शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीच मिळेनात; वधू-वर मंडळाने टेकले हात


शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीच मिळेनात; वधू-वर मंडळाने टेकले हात


कराड - "सरकारी नोकरीवाला नवरा हवा ग बाई" अशी आता अलीकडच्या मुलीची लग्नाच्यावेळी पहिली पसंती आहे. उत्तम नोकरी असणाऱ्या "वरा"ला लगेच मुलगी मिळते. व्यापार करणाऱ्यांना थोडे झगडावे लागते आणि शेती करणाऱ्या मुलाला मुलगीच मिळणे दुरापास्त झाले आहे. असा क्रम लग्न जमवताना लावला जात आहे. नोकरी देखील सरकारी असेल तर प्रथम प्राधान्य दिले जात आहे. यामुळे "वर"पक्षाच्या बापाची डोकेदुखी वाढली आहे.


शेतकरी कुटुंबातील मुलांबरोबर लग्न करण्यासाठी सहजासहजी मुली तयार होत नाहीत. मुली शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. आपण सुशिक्षित व शिकलेले असल्यामुळे जोडीदार असाच हवा असा मुली आई-वडिलांच्याकडे आग्रह धरतात. सध्याच्या मुलींची "वर" पक्षाबद्दल व भावी नवऱ्याबद्दल खूप अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकरी मुलांशी लग्न करण्यास मुली स्पष्टपणे नकार देतात. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमवताना अडचणी येत आहेत. मुलींनी व पालकांनी देखील मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कित्येक महिने सरकारी नोकरभरती झालेली नाही. मग सरकारी नोकरी नसणाऱ्या मुलांना मुलगी मिळणार कशी ? हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.


गतकाळामध्ये घरातल्या मुलीच्या लग्नाची चिंता संपूर्ण कुटुंबाला लागून रहायची, सद्यस्थितीत परिस्थिती बदललेली आहे. लग्नाचे वय झाले तरी मुलांची लग्न होत नसल्याने पालक चिंतेत पडले आहेत. कराड, पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांतील शेतकरी मुलांची लग्न रखडली. यामध्ये कोरडवाहू शेतकर्‍यांबरोबर बागायतदार शेतकर्‍यांच्यां कुटुंबातील मुलाला मुलगी देण्यास कोणी तयार होईना. इतकेच काय पण कोरडवाहू शेतकर्‍यांच्या मुलांना कोणी स्थळे दाखवायला तयार नाहीत. त्यामुळे "वर" बापाची चिंता वाढतेच आहे. दरम्यान वधू-वर सूचक मंळडांना देखील शेतकरी कुटुंबातील मुलाचे लग्न जमविताना अग्नीदिव्य पार करावे लागत आहे. 


वधू-वर सूचक मंडळांनी हात टेकले


सरकारी नोकरदारांपेक्षा काही शेतकर्‍यांचे उत्पन्न अधिक असूनही मुलांची लग्न रखडली आहेत. वधू-वर सूचक मंडळांचेही प्रयत्न अपुरे पडत आहेत. शेतकरी मुलांचे वडील मुलांचा लग्नाचा बायोडाटा घेऊन त्यांच्याकडे अपेक्षेने जात आहे. मात्र मुलींच्या अपेक्षेपुढे वधू-वर सूचक मंडळांनी हात टेकले आहेत. 


चाळीसीकडे आलेल्या मुलांची लग्न जमेना


कराड व पाटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लग्नाळू मुलींच्या तुलनेत दुपटीने मुलांची संख्या आहे. मुलांचे वय चाळीसीकडे गेले आहे मात्र लग्नाचा पत्ता नाही. ही परिस्थिती अनेक गावागावात पहायला मिळत आहे. लग्न केले तर सरकारी नोकरी असणाऱ्या मुलांशी, अन्यथा शेतकरी मुलाशी लग्न करणार नाही, अशी आजच्या मुलींची भूमिका दिसून येत आहे.