खा.श्रीनिवास पाटील यांची स्थायी समितीवर निवड


खा.श्रीनिवास पाटील यांची स्थायी समितीवर निवड


कराड - साताराचे खा. श्रीनिवास पाटील यांची रसायन व खते संबंधित स्थायी समितीवर तसेच कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ही निवड लोकसभा सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.


मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक काही दिवसापूर्वी पार पडली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रश्ना संदर्भात राज्यातील सर्व खासदारांनी दिल्ली येथे पाठपुरावा करावा असा निर्णय घेण्यात आला होता. अति विषारी रासायनिक औषधांमुळे विदर्भ, मराठवाडा व राज्यातील अनेक शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागले होते. महाराष्ट्र शासन त्या अति विषारी रासायनिक औषधांवर बंदी घालण्याबाबत केंद्र शासनाशी पाठपुरावा करत आहे. खा. श्रीनिवास पाटील यांनी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना रासायनिक औषधांविषयी अतारांकित प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात कृषिमंत्री यांनी महाराष्ट्र सरकारला योग्य तपासणी करून कीटकनाशक अधिनियम 1967 नुसार प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. 


याशिवाय खा. श्रीनिवास पाटील यांनी पुणे - मिरज रेल्वेच्या दुहेरीकरण कामासाठी संपादित केलेल्या शेतक-यांच्या जमिनीचा प्रश्न सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात उद्भवला असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या प्रश्नाबाबतही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी समन्वय साधून सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खा. श्रीनिवास पाटील यांनी संसदेत जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. आता त्यांची रसायन व खते संबंधित स्थायी समितीवर तसेच कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


 ज्ञानाचा फायदा यासाठी होईल : श्रीनिवास पाटील


शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे मला शेतीविषयी मनापासून आवड आहे. शेतीचा अनुभव असल्याने कृषी व शेतकरी कल्याण समितीवर झालेली निवड देखील शेतकरी बांधवांसाठी मदतीची ठरेल. नोकरीमधे असताना हिंदुस्तान एंटीबायोटिक या कंपनीवर पर्सनल मॅनेजर म्हणून काम पाहिले. तसेच सिक्कीमचे राज्यपाल असताना जैविक शेती करण्यासाठी रासायनिक खते, फवारणी बंदी कायदा करण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाली. सिक्कीममधील फार्मासिटिकल इंडस्ट्रीबद्दल असलेल्या ज्ञानाचा फायदा यासाठी नक्कीच होईल.
- खा. श्रीनिवास पाटील