कोरोनाच्या एकूण पाचही रूग्णांवर उपचार सुरू, प्रकृती उत्तम.....विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

कोरोनाच्या एकूण पाचही रूग्णांवर उपचार सुरू, प्रकृती उत्तम.....विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर


पुणे -  पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असून पाचही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत अधिक होत असल्याणने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


 जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.


 विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी मास्कचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच याबाबत सर्व खाजगी रुग्णालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यकता असेल तरच प्रवास करा, असे सांगून स्वच्छतेच्या बाबतही दक्ष राहण्याचे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले.
 


कोरोनारुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती मिळविण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सांगून  आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले,  कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल. कोरोनाबाबतच्या जाणीव जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


 जिल्हाधिकारी राम म्हणाले, नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण म्हणून दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण २१ ठिकाणी २०७ बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार करण्यात आले  असून विविध विलगीकरण कक्षांमध्ये 200 बेडस् उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, याबाबत शासनस्तरावरून आवश्यकता भासल्यास निर्णय घेण्यात येईल.