जयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले
कराड : येथील सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 1 कोटी 29 लाख रूपये एवढा ढोबळ नफा झाला असून, पतसंस्थेने 265 कोटी 45 लाख रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय केला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या प्रेरणेने 19 वर्षांपूर्वी ही पतसंस्था सुरू करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून, सामान्य शेतकरी, कष्टकरी समुदायातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था कार्यरत आहे.
पतसंस्थेस 31 मार्च 2020 अखेर सर्व तरतुदी वजा जाता 61 लाख 29 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असून, 7 कोटी 24 लाख रुपपयांचा स्वनिधी संस्थेकडे शिल्लक आहे. तसेच संस्थेचा निव्वळ एनपीए हा शून्य टक्के राहिला आहे. सध्या देशभरात वेगाने फैलावणार्या कोराना साथीच्या पार्श्वभूमीवरही पतसंस्थेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचार्यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. आज संस्थेचे मलकापूर येथील प्रधान कार्यालय आणि उंबज व सातारा शाखा या स्वमालकीच्या इमारतीत आहेत. सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या 12 शाखा असून, भविष्यात पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा मनोदय संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील (दाजी) व व्यवस्थापक ए. के. यादव उपस्थित होते.