रस्त्यावरले चाक थांबले ; प्रशासन धावले मदतीला


रस्त्यावरले चाक थांबले ; प्रशासन धावले मदतीला


 


जगभरात कोरोना (कोविड-19) या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना, आपल्या देशातीही या संकटाने पाय पसरले, योग्य वेळी  शासनाने यावर पायबंद घातले. देशहितासाठी घेतलेल्या या निर्णयाला जनसामान्यांनीही सक्रीय सहभाग नोंदविला आहे. 23 मार्च नंतर आपापल्या गावाकडे निघालेल्या व्यवसायिकांना, कामगारांना शासनाने हे संसर्गाचे संकट अधिक गडद होवू नये म्हणून जिथे असाल तिथे थांबा असे आदेश देवून त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करण्याच्या सूचना दिल्या. सातारा जिल्हा मुंबई-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून जाणाऱ्या व्यावसायिक आणि कामागारांना जिल्हा प्रशासनाने राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली. त्या संदर्भातील हा लेख.


 केंद्र शासनाने कोरोचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन केल्यानंतर महाराष्ट्रात काम करणारे परराज्यातील नागरिक हे  आपापल्या गावी जात होते, अशा 277 नागरिकांनी राहण्याची, जेवणाची उत्तम सोय सातारा जिल्हा प्रशासनाने चांगल्या पद्धतीने केली आहे.


यशोदा शिक्षण प्रसारक, मंडळ, सातारा येथे 164, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात 56 तर पाच पाडंव आश्रमशाळा, अलगुडेवाडी ता. फलटण येथे 57 असे एकूण 277 नागरिकांची राहण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे. या सर्वांना सकाळी नाष्टा, दुपारी व रात्रीचे जेवण प्रशासनामार्फत देण्यात येत आहे. काही स्वयंसेवी संस्थांनीही पुढकार घेतला असून या  277 नागरिकांना जेवण देवण्याचे काम करीत आहेत.   


मी बेंगलोरमध्ये कारपेंटरचे काम करतो. केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉक डाऊन केल्यानंतर माझे कुटुंब घेऊन  राजस्थान राज्यातील बिकानेर येथे निघालो होतो. सातारा जिल्हा प्रशासनाने आम्हाला साताऱ्यात थांबवून यशोदा महाविद्यालय राहण्याची चांगल्यापद्धतीची सोय केली आहे. सकाळी नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण देण्यात येत आहे. प्रशासनाने आमची चांगली सोय केल्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी आहे, अशा भावना राजस्थान राज्यातील बिकानेर येथील रुपा राम यांनी व्यक्त केल्या.


 मी मनोहर सिंग राजस्थान राज्यातील बिकानेर या गावचा रहिवाशी. बेंगलोर मध्ये कारपेंटरचे काम करीत आहे. लॉक डाऊन नंतर आम्ही आमच्या गावी बिकानरे येथे निघालो होतो. जिल्हा प्रशासनाने सातारा येथे आम्हाला थांबवून घेतले व राहण्याची सोय केली. आमच्या प्रत्येक दैनंदिन गरजा प्रशासनामार्फत पुरविल्या जात आहेत राहण्यामध्ये कुठलीच अडचण नाही. माझ्या सोबत माझा मुलगाही येथे राहत आहे. 


 संपूर्ण देशात लॉक डाऊन मुळे आम्ही सातारा येथे थांबलो. राहण्याची, जेवणाची उत्तम सोय असून माझ्या मुलीला रोज सकाळी दूधही मिळत आहे, असे राजस्थान राज्यातील बिकानेर येथील अनुपी देवी यांनी सांगितले.


 संपूर्ण देशात लॉक डाऊन नंतर पर राज्यातील महाराष्ट्रात काम करणारे नागरिक हे परत आपल्या राज्यात चालले होते. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 277 नागरिकांना जिल्ह्यातच थांबवून घेतले त्यांची जेवणा,राहण्याची सोय केली. यामध्ये कर्नाटक, तांमिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश यासह विविध राज्यातील मजूर आहेत.


 यशोदा शिक्षण प्रसार, मंडळ, सातारा येथे 164 नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.  या 164 नागरिकांना सकाळी, चहा, नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण देण्यात येते. त्याचबरोबर आंघोळीसाठी साबण, टुटपेस्ट दिली जात आहे. तसेच 164 नागरिकांची रोज सकाळी आणि संध्याकाळी आरोग्याची तपासणीही केली जात असून त्याचा अहवाल प्रशासनाला पाठविण्यात येत आहे. या नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेत असल्याचे तलाठी व्ही.बी. पेंडसे यांनी सांगितले.


- युवराज पाटील


जिल्हा माहिती अधिकारी, सातारा