मदतीला सरसावले कृतज्ञतेचे हात...!!

 


मदतीला सरसावले कृतज्ञतेचे हात...!!


समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रसंग अशा वेळीच येतात, ज्या वेळी आपत्ती येते. अशा आपत्तीत संपत्ती असणाराही हतबल होतो. अशा प्रसंगी काही संस्था आणि व्यक्ति मानवतेचे दूत होवून पुढे येतात अन् हे कृतज्ञेचे हात मानवतेच्या हितासाठी पुढे येतात. गेल्या काही दिवसात साताऱ्यात हा ओघ येतो आहे. त्याचा घेतलेला हा आढावा…


कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जिल्ह्यातील विविध संस्थांनी  दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने 16 लाख, ‘अध्यक्ष’ ही श्रींची इच्छा गणेश मंदिर ट्रस्ट, गोडोली, सातारा 5 हजार रुपये, दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेकस, सातारा 51 हजार रुपये, श्री सुविधीनाथ श्वेतांबर जैन मुर्तीपुजक संघ, सातारा 1 लाख, श्री शांतिगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान, मलवडी ता. माण 1 लाख, श्री महंत शांतीगिरीजी महाराज, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मलवडी ता. माण 1 लाख, श्री पार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्ट, सातारा 1 लाख, टिळक मेमोरियल चर्च, सातारा 2 हजार रुपये, आणि आदर्श एज्युकेशन सोसायटी मु. परतवडी पो. रेवडी ता. कोरेगाव यांनी 5 हजार रुपये असे एकूण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 20 लाख 81 हजार रुपये निधी संकलीत झालेला आहे.


तसेच श्री महंत शांतीगिरीजी महाराज, ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था, मलवडी ता. माण यांनी 1 लाख, उज्वला कोळेकर  व सुजाता कानेटकर यांनी 5 हजार रुपये तर इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या साताऱ्यातील कु. अक्षरा वैभव चव्हाण या मुलीने 1 हजार 1 रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केलेला आहे.


            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यपातळीवर कार्यरत असलेल्या दोन्ही संस्थांच्यावतीने प्रत्येकी 11 हजार याप्रमाणे 22 हजार रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा करण्यात आले. या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी   रक्कमेचा धनादेश फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला.


कॉनफेडरेशन ऑफ रिअल इस्‍टेट डेव्‍हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई)  सातारा शाखा व आयआयए सातारा शाखेने  प्रशासनाला सहकार्य करण्‍यासाठी हात पुढे सरसावले आहेत. आयआयए सातारा शाखेतर्फे 51 हजारांचा धनादेश मुख्‍यमंत्री सहाय्‍यता निधीसाठी प्रदान करण्‍यात आला असून  आयआयए सातारा  व क्रेडाई सातारा तर्फे परराज्‍यातील सातारा येथे अडकून पडलेल्‍या कामगारांना किराणा साहित्‍य व  अन्‍य वस्‍तूंची २०० किटस्‌ वितरण करण्‍यात आले आहे. या किटमध्‍ये 3 नागरिकांना किमान पंधरा दिवस पुरेल इतके किराणा साहित्‍य व अन्‍य वस्‍तू सामील करण्‍यात आल्‍या आहेत.


            रा. स्व. संघाचे स्वयंसेवक त्यांच्या संपर्कातून अशा अनेक सेवा वस्त्यांमधून गरजू कुटुंबांची माहिती मिळवत आहेत व समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहभागाने त्या कुटुंबापर्यंत   मदत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.  या कुटुंबांमध्ये प्राधान्याने कातकरी, पारधी, वैदू, नंदीवाले, लमाणी अशा अनेक प्रकारच्या समाज बांधवांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम  चालू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 762 कुटुंबांपर्यंत रा. स्व. संघाने मदत पोहविली आहे. तसेच सातारा शहरात विविध गरजू व्यक्तींना  1600 किलो भाजी-पाल्याचे  वाटप करण्यात आले आहे. सातारा शहरा जवळील राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या 75 वाहन चालकांना जेवण देण्यात कामही रा. स्व. संघ करीत आहे.


                                                                                                            - युवराज पाटील                                                        जिल्हा माहिती अधिकारी, सातारा