आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे यावे, शासनासोबत या युद्धात सहभागी होऊन मदत कार्य करावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई मेल वर नोंदवावे असे आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. समाजमाध्यमाद्वारे जनतेशी साधलेल्या थेट संवादादरम्यान ते बोलत होते.
सर्दी, पडसे आणि तापाचे लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे पुढील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सौम्य लक्षणे, तीव लक्ष्णे आणि तीव्र लक्षणांबरोबर इतर तक्रारी आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. तीव्र लक्षणे, गंभीर आजार व इतर तक्रारी असणाऱ्या रुग्णांना तिसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असून ही रुग्णालये ह्दयविकार, किडणी, मधुमेह यासारख्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज असल्याचे ते म्हणाले.
किमान आधारभुत किंमतीने धान्य द्यावे
श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेत केवळ तांदुळ मिळत आहे, त्याचे वाटप ही आपण सुरु केले आहे, परंतू त्याचा केशरी कार्डधारकांना लाभ होत नाही. प्रधानमंत्री महोदयांना यासंदर्भात विनंती करणारे पत्र आपण पाठवले असून किमान आधारभूत किंमतीवर मध्यमवर्गीयांना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही सामुहिक जबाबदारी आहे. भार सर्वांवरच आहे. राज्य सरकारने कालच मंत्रिमंळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतल्याचे सांगतांना केंद्राने ही यात मदत करावी अशी मागणी आपण केली आहे.
शिवभोजनची व्याप्ती आणि क्षमता दोन्ही वाढवल्या
शिवभोजन केंद्राची व्याप्ती वाढवतांना योजनेची क्षमता एक लाखापर्यंत वाढवल्याचे व यात आणखी वाढ करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थलांतरीतांच्या कॅम्पमध्ये साडेपाच ते सहा लाख लोकांची व्यवस्था
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच स्थलांतरीत मजुर कामगार आणि इतर राज्यातील लोकांसाठी जे कॅम्प सुरु करण्यात आले आहेत तिथे जवळपास साडेपाच ते सहा लाख लोक वास्तव्याला आहेत. त्यांना एकवेळेसचा नाश्ता, दोनवेळेसचे जेवण दिले जात आहे. साधारणत: पाच लाख लोक धरले तरी तीन वेळा याप्रमाणे १५ लाख लोकांना दररोज माणुसकीच्या धर्मानुसार आपण जेवण उपलब्ध करून देत असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.