पोलीसांचे मनोबल वाढविण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा दुचाकीवरुन एकटयाचाच फेरफटका


पोलीसांचे मनोबल वाढविण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा दुचाकीवरुन एकटयाचाच फेरफटका


कराड - कोरोना आजाराने हाहाकार माजविला असल्याकारणाने गंभीर आणि अडचणीच्या काळाचा सामना करण्याकरीता व नागरिकांना कोरोना आजारापासून दुर ठेवणेकरीता देशातील, राज्यातील,शहरातील आणि गावागांवातील पोलीस यंत्रणा ही आपला जीव मुठीत धरुन आपल्या सर्वांच्या सुरक्षितेकरीता रस्त्यावर उभी राहून काम करीत आहेत.ही यंत्रणा रस्त्यावर कार्यरत आहे म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत या जाणिवेतून राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आज राज्यातील पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याकरीता संचारबंदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करुन त्यांच्या सुरक्षेकरीता असणारा सर्व फौजफाटा बाजूला ठेवून सातारा शहरात दुचाकीवरुन एकटयानेच फेरफटका मारुन सातारा शहरातील संचारबंदीची ठिकठिकाणी पहाणी केली व कार्यरत पोलीस यंत्रणेची आरोग्याची चौकशी करीत त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना करीत त्यांचे मनोबल वाढविले तर काहीठिकाणी हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीसांना त्यांनी कडक शब्दात समजही दिली.


भारत देशासह,इतर देशामध्ये तसेच अनेक राज्यामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले असल्यामुळे देशाचे पंतप्रधान यांनी संपुर्ण देशामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन करुन सर्व संचारबंदी व जमावबंदी केली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वत्र बंद ठेवण्यात आले असून कोरोना आजारापासून दुर ठेवणेकरीता व संचारबंदीचे योग्य पालन होणेकरीता संपुर्ण देशभरात पोलीस यंत्रणा सुरक्षेसाठी रस्त्यावर कार्यरत आहेत. आपला जीव मुठीत धरुन ही पोलीस यंत्रणा २१ दिवसांचे लॉकडाऊनच्या काळात चोख बंदोबस्त व शासनाच्या नियमांचे पालन करण्याकरीता दिवसरात्र झटत आहे. या पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याची खऱ्या अर्थाने गरज असून ही गरज ओळखली ती राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी.कठीण परिस्थितीत पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सकाळी त्यांच्या सुरक्षेकरीता असणारा सर्व फौजफाटा बाजूला ठेवला आणि घरातील दुचाकी बाहेर काढून कुणालाही बरोबर न घेता संचारबंदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करीत दुचाकीवरुन सातारा शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी थांबून प्रत्यक्ष पहाणी केली.


सुमारे ०१ तास त्यांनी दुचाकीवरुन संपुर्ण सातारा शहरातील बंदोबस्तांची पहाणी करताना त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस यंत्रणेला काही अडचण आहे का? याचीही त्यांनी आर्वजुन चौकशी करीत बंदोबस्त बजाविताना स्वत:ची काळजी घ्या असे सर्वांना सांगत पोलीस यंत्रणेला धीर देण्याचे काम करण्याबरोबर सतर्क राहण्याच्या सुचना त्यांनी केल्या तर काही ठिकाणी बंदोबस्तात त्यांना काही पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचेही आढळून आले त्यावेळी त्यांनी त्यांच्या असणाऱ्या कडक भाषेत अशा हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीसांना समजही देण्याचे काम केले. आपल्या विभागाचे पोलीस दिवसरात्र कोरोना आजाराचा सामना करण्याकरीता रस्त्यावर झटत आहेत त्यांची काळजी घेणे जसे यंत्रणेचे काम आहे तसेच राज्याचा गृहमंत्री म्हणून आपलेही काम आहे याच जाणिवेतून त्यांनी सातारा शहरातील पोलीस यंत्रणेची काळजी घेणेकरीता हा फेरफटका मारला असल्याचे सांगून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा शहरात आज दुचाकीवरुन मारलेला फेरफटका सातारा शहरातील पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविणारा तर ठरलाच पंरतू राज्यातील पोलीस यंत्रणेचेही मनोबल वाढविणारा ठरला असून राज्याला सह्दयी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने लाभले आहेत अशी भावनाही सातारा शहरातील पोलीस विभागात निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळाले.


सातारा शहरात दुचाकीवरुन फेरफटका मारत असताना काही बाहेरगांवाहून आलेले वयस्कर नागरिकही त्यांना रस्त्यावर भेटले त्यावेळी त्याठिकाणी थांबून त्या वयस्कर व्यक्तींना कुठुंन आला? काय काम होते? कसली अडचण तर नाही ना? असेल तर हा माझा नंबर आहे अडचण असेल तर फोन करा असे सांगून स्वत:ची काळजी घ्या अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे टाळा अशीही विनंती ना.शंभूराज देसाईंनी भेटलेल्या सर्वांना या दुचाकीच्या फेरफटक्यामध्ये केली.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दुचाकी वरुन मारलेल्या फेरफटक्याची संपुर्ण सातारा शहरात चर्चा एैकावयास मिळत होती.