महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था : मंत्री बाळासाहेब पाटील


 


कराड - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात दि.3 मे पर्यत शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या  कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासंदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याशी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला


मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले,कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांची किराणा माल आणि भाजीपाल्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सहकार विकास मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. आता पर्यत सुमारे 3 हजार 700 सहकारी गृहनिर्माण  संस्थांनी  महामंडळाच्या www.mahamcdc.com या संकेतस्थळावर ऑनलाईन भाजीपाला, अन्नधान्याची नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फत थेट भाजीपाला पुरवठा करण्यात येत आहे.अशी माहिती सहकार मंत्री श्री. पाटील यांनी दिली.


श्री. पाटील म्हणाले, राज्यात  सहकारी गृहनिर्माण संस्थाची  संख्या सुमारे 96 हजार एवढी असून मुंबई, ठाणे,पुणे या प्रमुख शहरातील  सहकारी  गृहनिर्माण संस्थाची संख्या जवळपास 82 हजार एवढी आहे.मुंबई आणि  पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थाचा ऑनलाईन बुकिंग साठी मोठ्या प्रमाणत प्रतिसाद आहे.सर्व विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक आणि  सहाय्यक निबंधक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना संपर्क साधून त्यांना शेतकरी उत्पादक गट उत्पादक कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न कारावे त्यामुळे  ग्राहक घराबाहेर येणार नाहीत आणि गर्दीही होणार नाही. 


शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून निघाल्यापासून ते बाजार समिती मध्ये येईपर्यत आवश्यक ती काळजी घ्यावी, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्रास होता काम नये, याची सर्व जबाबदारी सहकार विभागांनी घ्याव तसेच ग्राहक आणि शेतकरी यांच्यात योग्य समन्वय ठेऊन कामकाज करावे असेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. यासाठी आवश्यक तो  सोशल डिस्टन्सिंग पाळावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि अन्नधान्य, भाजीपाला,फळे यांचा पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत अशा  सूचनाही श्री. पाटील यांनी  यावेळी दिल्या. 


बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे,राज्य सहकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, खाजगी सचिव संतोष पाटील उपस्थित होते.