कराड अर्बन बँकेकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला १६ लाखांची मदत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त


कराड अर्बन बँकेकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला १६ लाखांची मदत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त


कराड - कराड अर्बन बँकेकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला १६ लाखांची मदत देण्याचा धनादेश सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कराड अर्बन बँकेचे अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, चेअरमन सुभाष एरम,उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्यावतीने सुपर करण्यात आला.


पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, 'कराड अर्बन बँकेला असणाऱ्या प्रदीर्घ अशा सामाजिक बांधिलकीच्या वारशाची जपणूक बँकेने कॄतीपूर्णरीतीने पुन्हा एकदा केली आहे. आर्थिक मदतीमध्ये सेवकांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग हा निश्चितच अभिनंदनीय आणि सर्वांसाठी अनुकरणीय आहे. बँकिंगबरोबरच कराडच्या सामाजिक क्षेत्रातील कराड अर्बन बँकेचे कार्य नेहमीच मोलाचे आणि उल्लेखनीय राहिले आहे. अन्य सहकरी संस्थांनी याचा आदर्श घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


गेल्या दोन महिन्यांपासून जागतिक पातळीवर जवळपास सर्वच देशांत कोरोना नामक विषाणूमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. देशात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सरकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारोनाविरुद्धच्या लढ्यात आर्थिक मदतीचे आवाहन अनेक पातळ्यांवरून केलेले आहे. 


कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बँक ही अत्यावश्यक सेवा सदरामध्ये येत असल्याने कराड अर्बन बँकेने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांना बँकिंग सेवा अतिशय उत्तमपणे दिली आहे. त्यासाठी बँकेचे सर्वच सेवक कार्यरत असून स्वत:बरोबरच ग्राहकांची काळजीदेखील घेत आहेत. बँकिंगबरोबरच सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्याचे आणखी एक पाऊल पुढे टाकत बँकेने रु.११ लाखांचा तर बँकेच्या सेवकांनी स्वयंस्फूर्तपणे एक दिवसाच्या पगारातून रु.५ लाखांचा असा एकूण रु.१६ लाखांचा निधी कोरोना लढ्यासाठी निर्माण केलेल्या 'मुख्यमंत्री साहाय्यता निधीस' देण्यासाठीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. 


याप्रसंगी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, उपनिबंधक कराड मनोहर माळी उपस्थित होते. कराड अर्बन बँकेच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी बँकेला शुभेच्छा दिल्या.