...अन् पोलिसामुळे आजीबाईच्या घरातील देवाचा दिवा लागला


.....अन् पोलिसामुळे आजीबाईच्या घरातील देवाचा दिवा लागला


 *सदाशिव खटावकर ( माऊली )


कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला शांत व  सुनसान रस्त्यावर एक वृद्ध महिला दिसली.... सर्व शहर घरात निपचीत पडले असताना *या म्हातारीकडे एवढी हिंमत कशी आली? म्हणून रागानेच त्या पोलिसाने वृद्ध महिलेला दरडावले... " आजीबाई जीव प्यारा हाय का नाय? कशाला रातचं फिरताय रस्त्यावर,? "आजीबाई त्या पोलिसाला जवळ आल्या आणि म्हणाल्या, " ले का घरातलं सामान संपत आलय, अजून आठवडाभर काढीन पण चार दिस झालं, माझा देव अंधारात हाय, देवापुढे दिवा पेटवायसाठी तर कुठं गोडतेलाचा टाक मिळतो का बघत्ये! मी बिन तेलाची खाईन पण त्याला अंधारात बघून कापरं भरतय!" म्हातारीची ती वाक्य ऐकून पोलीसातील माणूस जागा झाला... त्या आजीबाईंना " सकाळी दहा वाजता या आजी, मी तुम्हाला तेल देण्याची व्यवस्था करतो " असे सांगून घरी पाठवले. 


          दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कराडातील शिवाजी हाऊसिंग सोसायटी मध्ये कर्तव्य बजावत असताना संबंधित पोलीस हवालदार मारुती चव्हाण यांना ती आजीबाई दुरूनच नजरेस पडली, पटकन त्यांनी शटर बंद करून मागणीप्रमाणे किराणामाल पोहच करणाऱ्या जवळील दुकानदाराला गाठले, तेलाच्या पिशवीचा दर विचारतच खिशात हात घातला... दुकानदाराने शंभर रुपये सांगितले, खिसा झाडला तर सत्तर रुपये निघाले,उरलेल्या तीस रुपयांसाठी मारुती चव्हाण यांनी शेजारून निघालेल्या खराडे हवालदारांना हाक मारली व आणखी तीस रुपये घेऊन दुकानदाराला दिले व तेलाची पिशवी ताब्यात घेतली... तोपर्यंत म्हातारी कालच्या ठिकाणी येऊन थांबली होती... पोलीस हवलदार चव्हाण यांनी तेलाची पिशवी म्हातारीच्या हातावर टेकवली आणि क्षणातच म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.. डोळ्यातील थेंब डाव्या हाताने बाजूला सावरत म्हातारी गहिवरली, " ल्येका, देवासारखा धावून आलास बघ, तुझ्यामुळे माझं घर उजाळलं आता, तुझी पोरं बाळ सुखात राहतील "असे बोलून म्हातारी पाठीमागे फिरली... संबंधित पोलीस चव्हाण यांना काहीच सुचले नाही, म्हातारीच्या आशीर्वादाने ते कृतकृत्य झाले... ना त्यांनी म्हातारी चे नाव विचारले ना त्यांनी म्हातारी सोबत फोटो काढला!


शंभर रुपयांच्या तेलाच्या पिशवीमध्ये त्यांनी संपूर्ण आसमंत उजाळला होता... त्या शंभर रुपयांची मदत म्हातारीला लाख रुपयाच्या मदती प्रमाणे वाटत* होती. पोलिसातील माणुसकीचे दर्शन म्हातारीला घडले होते आणि आजीबाईंच्या आशीर्वादामुळे पोलीस हवालदार चव्हाण यांनाही गदगदून आले होते..  कोरोना लवकर जा, हे जग खूप चांगले आहे रे....!