लहानग्यांचे बोबडे बोल बुजुर्ग लोकांच्या कौतुकास पात्र ठरले.....दुसरे विद्यार्थी साहित्य संमेलन


कराड (राजसत्य) - रंगीबेरंगी कपडे घालून वावरणारी छोटी मुलं,  त्यांच्या मुखातून बाहेर  पडणाऱ्या बालकविता, बालगीते, नाट्याविष्काराचे बोबडे बोल, अनेक प्रतिभावंत   कवी, लेखकांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या  विविध पुस्तकावरून फिरणार्‍या किलबिल नजरा, कौतुकाची  थाप पाठीवर घेऊन गेल्या.एरवी व्यासपीठावर दिसणाऱ्या मोठ्या लोकांन ऐवजी लहानग्यांनी विविध कार्यक्रम तसेच सूत्रसंचालन पासून आभारापर्यंत सर्व जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या आणि लहानग्यांचे बोबडे बोल बुजुर्ग लोकांच्या कौतुकास पात्र ठरले.


निमित्त होते येथील शिक्षण मंडळ कराड आयोजित दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे. शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थी पुस्तकाकडे आकर्षक व्हावेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेतून कराडचे सांस्कृतिक वैभव आणखी प्रगल्भ व्हावे, या हेतूने दुसरे विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित केले होते. महिला  विद्यालयाच्या प्रांगणात, आचार्य विनोबा भावे  मंडपात व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  साहित्य मंचावर दुसरया विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरूवात उत्साहात झाली. पहिल्या सत्रात  जयसिंगपूरच्या साहित्यीका, अभिवाचक नीलम माणगावे, साहित्यिक डॉ. राजाराम कुंभार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पण करून करण्यात आली. यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन शिल्पा वाळिंबे, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे सहसचिव राजेंद्र  लाटकर, अँड. अरविंद घाटे, टिळक हायस्कूल चे मुख्याध्यापक जी.जी अहिरे, प्रसिद्ध वाचक अरुण काकडे यांची उपस्थिती होती.


पहिल्या सत्रात अभीवाचक, नीलम माणगावे यांनी बोधप्रद व मनोरंजनात्मक कथा सादर केल्या. "हत्ती आणि मुंगी" या बोधकथा सादरीकरणाने दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनात वेगळीच गोडी निर्माण केली. बालवाचक, बालसाहित्यिकांना बोधकथांनी  प्रेरणा दिली. नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक कुसुमाग्रज  तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनावर आधारित" अक्षरबाग " हा  बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 


 पहिल्या सत्राचे अध्यक्ष साहित्यिक डाँ. राजाराम कुंभार यांनी विविध कथांच्या माध्यमातून मानवी जीवन व जीवनातील वाचनाचे महत्त्व पटवून दिले. स्वर्ग आणि नर्क यातील प्रत्येकाची आवड वेगळी असते. मात्र अनेकांना नरका पेक्षा स्वर्गच आवडतो. मात्र स्वर्गात जाण्यापेक्षा आपण पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण केला तर....! हा स्वर्ग आपल्याला वाचनातून व उच्च प्रतिभेतून निर्माण करता येतो, हे लोकमान्य टिळक यांच्या विचारांची नाळ  पटवून दिली.दिड दिवस शाळा शिकलेला छोटासा अण्णा भविष्यातील  ख्यातनाम  साहित्यिक अण्णाभाऊ साठे निर्माण कसे झाले. हे आपल्या विचारातून विद्यार्थ्यांच्या मनावरती सहज ठसवले. शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला.


प्रास्ताविक शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी केले.  शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी  चंद्रशेखर देशपांडे  यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आलीे. टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील अत्यंत बहारदार पोवाडा सादर केला. पोवाडा आदित्य कदम व राजवर्धन भोसले यांनी मकरंद किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. या सत्रात वाचक डॉ.शर्वरी बेलापुरे अध्यक्षस्थानी होत्या तसेच शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी, चंद्रशेखर देशपांडे ,व्हा. चेअरमन शिल्पा वाळिंबे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांची उपस्थिती होती. टिळक हायस्कूलचा माजी विद्यार्थी सुशांत पावशे याने  'शिवपुत्र संभाजी ' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. आदर्श पाटील, श्रीकृष्ण शेवाळे यांनी "तीन मुलांचे चार दिवस- एक" थरारक अनुभव  सादर केला. शेवटी  टिळक हायस्कूल चे मुख्याध्यापक जी .जी अहिरे ,लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांनी आभार  मांनले.