शालेय विद्यार्थ्यांना खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन हवे.......खेळात सहभाग घेतलाच पाहिजे


शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थीदशेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण यामुळे मुलांच्यामध्ये संघ भावना निर्माण होते. त्याचबरोबर एकमेकाला सहकार्य करून खिलाडू वृत्ती निर्माण होत असते. शालेय जीवनापासूनच खेळांची मुलांमध्ये आवड निर्माण केली पाहिजे. मुलांना विविध खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी शाळेमध्ये सुविधा उपलब्ध असतात. त्याचबरोबर खाजगी कोचिंग क्लासेस असतात. विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण देणारे तज्ञ उपलब्ध आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षणाबरोबर खेळाच्या शिक्षणासाठीही आग्रह धरला पाहिजे.


तरच येणारी युवापिढी ही सक्षम निरोगी राहील. त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती निर्माण होईल सर्वसाधारणपणे सार्वजनिक जीवनात वावरत असताना अनेक वेळेला अनेक प्रसंगांमध्ये वादविवाद होतात मात्र खिलाडी वृत्ती दिसून येत नाही कारण समोरच्याचे मन ऐकल्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे मात्र प्रत्युत्तर देत असताना ते बरोबर का खरे याचा विचार न करता जशास तसे उत्तर देण्याची मनोवृत्ती ही घातक आहे यातून गुन्हेगारी अथवा अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात याचा विचार करून लहानपणापासूनच प्रत्येकाला विविध खेळाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. खेळामुळे मुलांच्या मनाची मशागत चांगल्या प्रकारचे होते. मुलांना भावी आयुष्यामध्ये वाटचाल करताना खेळामुळे प्रेरणा मिळते. त्याचबरोबर संघभावना व समोरच्याला समजून घेण्याचा समजूतदारपणा खेळाच्या प्रत्यक्ष वावरामुळे मिळतो. पालकांनी मुलांच्या खेळाबाबत दक्ष असले पाहिजे, मुले कोणता खेळ खेळतात, त्या खेळासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.मुलांचे "मन" हे निरागस व कोमल असतात, त्यांच्यावर लहानपणात संस्कार होणे गरजेचे असते .


शालेय शिक्षणाबरोबर इतर शारीरिक श्रमाचे खेळ मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. देशभरामध्ये विविध खेळ खेळले जातात, त्याचबरोबर महाराष्ट्रातील खेळ अनेक प्रकारचे आहेत. मात्र आधुनिक उपकरणांच्या वापरामुळे काही खेळ लुप्त होत आहेत. अशा वेळेला या खेळांची आठवण मुलांना करून दिली पाहिजे, जुने व मुलांच्या मनाची मशागत होणारे खेळ मुलांना शिकवले पाहिजेत. राज्य शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल गंभीर आहे. अनेक वेळेला शिक्षणपद्धतीमध्ये बदल केला जातो. या बदलाचा उपयोग करून मुलांवर चांगले सुसंस्कारित संस्कार करण्यासाठी पालकांनीही आपला वाटा उचलला पाहिजे.


म्हणजे आपला पाल्य भविष्यामध्ये वाममार्गाला न जाता योग्य व चांगल्या मार्गावर वाटचाल करेल. या दृष्टीने इतर शिक्षणाबरोबरच खेळाच्या शिक्षणाकडे ही पालकांनी अधिकचा भर द्यावा.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, ते कोणत्याही स्पर्धेसाठी नाहीत. सदरचे खेळ स्पर्धेसाठी नसले तरी मुलांच्या मनावर चांगले संस्कार करण्यासाठी ग्रामीण भागातले खेळ मुलांना शिकवले पाहिजेत.कोणताही खेळ खेळण्यासाठी मुले तंदुरुस्त हवेत. मुलांना तंदुरुस्त करायचे असेल तर त्यांना खेळाप्रती गोडी निर्माण केली पाहिजे. खेळाची गोडी निर्माण झाल्यानंतर नक्कीच मुले चांगले खेळू शकतील. आणि वैचारिक दृष्ट्या ही त्यांच्या विचार पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो.


गोरख तावरे


9326711721