महाविकास आघाडी सरकार खातेवाटप’ आणि ‘पृथ्वीराज चव्हाण (बाबा)’ यांचे मंत्रीपद या अफवा मिडीयाने कोणत्या सूत्रांच्या सांगण्यावरुन पेरल्या? 


महाविकास आघाडी सरकार खातेवाटप’ आणि ‘पृथ्वीराज चव्हाण (बाबा)’ यांचे मंत्रीपद या अफवा मिडीयाने कोणत्या सूत्रांच्या सांगण्यावरुन पेरल्या?


महाविकासआघाडीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ व खातेवाटपाच्या वाटाघाटी पक्ष प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रिय पक्षाध्यक्षाकडे सोपवल्या आणि यासंदर्भात गुप्तता बाळगण्यात आली होती. काहीच बातमी हाताला लागत नाही म्हटल्यावर अजेंडाधारी मिडीयाने पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्ष महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ऊर्जा मंत्री पद देणार अशा बातम्या विविध प्रकारे लावल्या, दाखवल्यासुद्धा. अशा बातम्यांचा रतीब रात्रंदिवस सुरु होता. हे सगळं खातेवाटप संपल्यानंतरच थांबणार हे स्पष्ट असल्याने इतके दिवस मी प्रतिक्रीया दिली नव्हती.


सगळा धुरळा खाली बसल्यानंतर बोलणे ईष्ट ठरेल म्हणून मी शांत होते. पृथ्वीराज बाबा हे महाराष्ट्र काँग्रेसचा असा क्रेडीबल चेहरा आहेत जे केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयाचा समाचार अभ्यासपूर्ण लेखणीतून, प्रतिक्रियांतून घेतात, जे सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ईतर कोणालाही साधता येत नाही, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण बाबा सातारा लोकसभा उमेदवार, विधानसभा अध्यक्ष पद आणि मंत्रीपदांच्या शर्यतीत कधीच नव्हते हेच प्रथम आणि अंतिम सत्य आहे.


मात्र अजेंडा चालवणारे चॅनेल, आणि त्यांच्या सूत्रांनी त्यांचे बाबांच्यावर असलेले प्रचंड प्रेम दाखवण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच वाट्टेल त्या बातम्या दाखवल्या. हे चॅनेल्स 'पृथ्वीराज बाबा लोकसभा लढवणार' असे सांगत होते. नंतर 'पृथ्वीराज बाबा विधानसभा निवडणुकीत पराभूत होणार' असे दाखवत होते. मग सरकार स्थापन होतेय म्हटल्यावर 'पृथ्वीराज बाबा विधानसभा अध्यक्ष होणार', 'पृथ्वीराज बाबांच्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचा विरोध', 'पृथ्वीराज चव्हाण नाराज' ते ‘पृथ्वीराज बाबांना महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ऊर्जा मंत्री (काँग्रेसच्या वाट्याला येणारी खाती) अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दाखवल्या. वरीलपैकी एकही बातमी खरी ठरली नसून या सर्वच बातम्या धादांत खोट्या निघाल्या. मग प्रश्न असा निर्माण होतो की या सूत्रांना टिआरपी व चरीतार्थ चालवण्यासाठी कोण आदेश देते?


वास्तवाचा आणि बाबांच्या व्यक्तीमत्वाचा विचार करता, केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री, राज्यात मुख्यमंत्री आणि दिल्लीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या बाबांना महाराष्ट्र विधानसभेत मंत्रीपद घेण्याची आवश्यकताच ती काय? माजी मुख्यमंत्र्यानी नैतिकता दाखवत कोणतेही मंत्रीपद घेतले नाही अशी बातमी एकाही चॅनेल वा न्यूज पोर्टलने दाखवली नाही हे विशेष आणि शंकास्पद आहे. बाबांनी खातेवाटपाच्याआधी मराठी न्यूज चॅनेल्सना त्यांच्या बाईटमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, जे आमदार सलग दोन-तीन टर्म निवडून आलेत त्यांना या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्थान देणे गरजेचे आहे. मग बाबांनी मंत्रीपद घेण्याचा विषय येतो कुठे? काँग्रेसचे खातेवाटप हा महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि हायकमांड यांच्या अखत्यारीचा होता, जो पार पडलाय. त्यामुळे जी नाराजी उफाळलीये ती एक काँग्रेसी म्हणून माझ्यासाठी चिंताजनक आणि दुर्देवी आहे. त्यासाठी बाबांना दोष देता येणार नाही.


मात्र अजेंडाधारी चॅनेल्स, विविध पक्षांच्या नेत्यांच्या ऑफीसमध्ये जावून एरंडाचे गुऱ्हाळ चालवत तुटपुंज्या माहीतीवरुन सूत्र बनणारे बातमीदार आणि सूत्रांच्या आड लपून बातम्या पेरणारे विविध नेत्यांचे ऑफीस कर्मचारी यांना एक नम्र विनंती आहे. आमचे बाबा अतिशय संयमी व शांत आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या नावावर वाट्टेल त्या गोष्टी खपवू नयेत. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात एकदा का त्या मर्यादा पार झाल्या की बुरखा फाटायला वेळ लागत नाही. पैसा आणि टिआरपीच्या नादात पत्रकारीतेला काळीमा फासणारे जे प्रकार तुम्ही केलेत ते किळसवाणे आणि घाणेरडे आहेत. याची दखल महाराष्ट्रातील तमाम सूज्ञ जनतेने घेतली आहे. पण असे प्रकार करुन तुम्ही किती दिवस जनतेच्या नजरेत टिकणार आहात.


मित्रपक्षातील काहीजणांच्या फेसबुक, ट्विटर प्रतिक्रीया या इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत की त्यांचे श्रध्देय नेतेसुद्धा तितक्या खालच्या पातळीचे नाहीत. पण असो, हाथी चले अपनी चाल कुत्ते भौंके हजार. एक बाबाप्रेमी म्हणून 80 तासांचे सरकार कोणत्याही अमिषाला बळी न पडता उलथण्यात बाबांनी सिंहाचा वाटा उचलला आणि हा इतिहास सुवर्ण अक्षरांत कोरला गेला हेच माझ्यासाठी भरपूर आहे. काँग्रेस पक्षाने आजवर बाबांच्या बुद्धीमत्तेला, व्यक्तीमत्वाला आणि निष्कलंक चारित्र्याला साजेलशीच भूमिका दिली आहे आणि यापुढेही देत राहील यात शंका नाही.


जय काँग्रेस ✋