उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय...तृतीयपंथीय म्हणजे काय ? तृतीयपंथीय कल्याण मंडळ कशासाठी ? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय...!


कराड - तृतीयपंथीय, किन्नर, हिजडा हे शब्द न उच्चारणे आणि या व्यक्तींना चार हात लांब ठेवण्याची समाजाची मानसिकता आहे. "तृतीयपंथीय कल्याण मंडळ" स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तृतीयपंथीय यासंबंधाने जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. त्यातील एक छोटासा भाग खाली उद्धृत करण्यात आला आहे.


राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले बहुप्रतिक्षित तृतीयपंथीय कल्याण मंडळ येत्या २० दिवसांत स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत अजितदादा पवार बोलत होते. जन्मजात व्यंग निर्माण असणारे अथवा ना पुरुष, ना स्त्री अशा विचित्र प्रकारच्या जन्मामुळे अख्ख आयुष्य अवहेलना, निंदा-नालस्ती, समाजापासून दूर असणाऱ्या तृतीयपंथीयांना (किन्नर) प्रवाहांमध्ये आणणे, त्यांना न्याय देण्याच्या उदात्त हेतूने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय तृतीयपंथीयांसाठी दिलासा देणार आहे. समाजामध्ये स्त्री-पुरुषां प्रमाणेच अर्धपुरुष व अर्धनारी असणारे म्हणजेच तृतीयपंथी. जन्मजातच व्यंग असल्याने प्रथमता कुटुंबाकडून नंतर समाजाकडून अवहेलना होत असते. समाजापासून लांब असणारे तृतीयपंथीय केवळ भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत असतात. तृतीयपंथीय कल्याण मंडळामार्फत त्यांना न्याय देण्याची भूमिका, शासनाचा सकारात्मक दृष्टीकोण तृतीयपंथीयांना न्याय देणारा असेल.


‘तृतीयपंथीय समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जावे. या मंडळामार्फत तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी हे कल्याण मंडळ कार्य करणार आहे. तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी या मंडळामार्फत मराठी भाषेत हेल्पलाईन सुरु करण्यात येईल. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यासाठी या कल्याण मंडळामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. उपजीविकेची शाश्वती नसल्याने तृतीयपंथी समुदायाला वेश्‍यावृत्ती, भिक्षा, धार्मिक समारंभप्रसंगी लोकांना आशीर्वाद देणे आदी मार्गाचा आश्रय घ्यावा लागतो. तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्य आणि विभागीय स्तरावर तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तृतीयपंथीय यांच्या संबंधाने जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यापूर्वी लिखाण केले आहे. त्यातील एक छोटासा भाग याठिकाणी देत आहोत. तृतीयपंथीय, किन्नर, हिजडा म्हटले की, अनेकांच्या अंगावर रोमांच उभा राहतो. अशा व्यक्तींशी बोलणे, त्यांचे दुःख, वेदना समजून घेणे, अथवा तृतीयपंथीय व्यक्तींच्या संबंधाने लिखाण करणे, त्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेणे हे आजपर्यंत झालेले नव्हते.


किन्नरांचे (हिजड्यांचे ) मंदिर ....


आपल्या देशात ( उत्तर भारतात निदान शुभ कार्याला यांची आठवण येते ) तृतीय पंथीय समुहाची नेहमीच प्रचंड अवहेलना झाली आहे. जन्मजात अंध, मुकबधीर, मतीमंद वा अन्य काही व्यंग घेवुन जन्माला येणा-याना सहानभुती मिळते . मग हेही एक प्रकारचे व्यंग आहे याला का म्हणून आपण स्विकारत नाही ....हा यक्ष प्रश्न प्राचीन काळापासुन आहे. इंद्राच्या दरबारात यक्ष - गंधर्व आणि किन्नरांचे उल्लेख आहेत .... याला ठोस पुरावा नाही. मात्र पोथ्या आणि पुराणात यांचे संदर्भ सापडतात. शिखंडी हे पात्र असेल वा अर्जुनाचे वनवासातील बृहन्नडे चे रुप ...महादेवाचे अर्धनारी नटेश्वराचे रुप हे मानवी इतिहासात किन्नरांचे संदर्भ किती पुरातन आहेत हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत.


मला काही दिवसापुर्वी हादगाव ता. मुर्तिजापुर जि. अकोला येथे किन्नरांचे देवुळ असल्याचे समजले , माझी उत्सुकता वाढली एका कामासाठी मुर्तिजापुरला गेलो असता , यागावी गेलो. त्यांची गुरु नेहा गुरु दिलज्यान मुर्तिजापुर येथे असल्याचे कळले .... त्यानाही सोबत घेतले. हादगाव हे एकेकाळचे मोठे बाजारपेठेचे गाव मुर्तिजापुर वरुन तीन कि.मी अंतरावर आहे. यागावाच्या दक्षिणेला अर्धा कि.मी अंतरावर एक उजाड घुमट आहे ....तेच हिजड्यांच्या गुरुचे मंदिर आहे . या मंदिराचे बांधकाम चारशे वर्षे जुने असावे.... हे बांधकाम मुघल वास्तुशात्रा प्रमाणे दिसते. एकेकाळी इथे यात्रा भरत असल्याचे बुजुर्गानी सांगितले. देशभरातील हिजडे इथे येतात दर्शनाला ....दिलज्यान गुरु या आता गादी चालवत आहेत. दिलज्यान ही गादी चालविण्यासाठी पंजाब वरुन आल्या आहेत. त्यांचे क्षेत्र ठरवून दिलेले असते ....त्यांचे अनेक किन्नर शिष्य आहेत. टाळ्यांच्या मागच्या यातना ... अवहेलना त्यातून निर्माण झालेली मानसिकता ..... आपण जाणायला हवी ..... हे व्यंग माणुसकीच्या रंगात एकरुप व्हायला हव ....!! 


 युवराज पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.