सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षा वाढल्या

कराड वार्तापत्र - गोरख तावरे


सातारा जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद महाविकास आघाडी सरकारमध्ये मिळालेले आहे. कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट तर पाटण मतदार मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच मंत्री झाल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर कराड उत्तर व पाटण मतदारसंघांमध्ये या दोन मंत्रीमहोदय यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.आमदार बाळासाहेब पाटील आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहेत तर शिवसेनेचे आमदार सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणारे आमदार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, काँग्रेस पक्षाचे मिळून राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे दोन पक्षातील दोन आमदारांना नामदार म्हणून राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची हवी, या दोन्ही मंत्री महोदयांनी दिल्यामुळे रेंगाळलेले प्रकल्पला निधी मिळून प्रश्न मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. हा सकारात्मक दृष्टिकोन विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.


पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार तळागाळापर्यंत रुजला आहे. अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकास प्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने सुरू असते. कॅबिनेट मंत्री म्हणून बाळासाहेब पाटील यांना संधी मिळाली असली तरी त्यांच्याकडे सध्या सहकार व पणन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे बाळासाहेब पाटील हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. "सह्याद्री पॅटर्न" म्हणून महाराष्ट्रात सह्याद्री कारखान्याने लौकिक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यात "सह्याद्री" नेहमीच अग्रक्रमावर राहिलेला आहे. सहकार व पणन खात्याचा कार्यभार पाहताना बाळासाहेब पाटील महाराष्ट्रातील सहकार चळवळ अधिक गतिमान व सक्षम करण्याचा निश्चित प्रयत्न करतील. सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सहकार व पणन खाते बाळासाहेब पाटील यांना मिळाल्यामुळे या खात्याला नक्कीच न्याय देण्याची त्यांची भूमिका राहील.


पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई हे गेल्या पंधरा वर्षापासून पाटण मतदारसंघातून निवडून येत आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील यापूर्वीचे एकमेव आमदार म्हणून शंभूराजे देसाई यांचे काम इतर आमदारांनी पेक्षा सरस आहे. कारण शासन स्तरावर निधी मिळवून पाटण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत स्तुत्य असा आहे. गत पाच वर्षांमध्ये १८००० कोटींचा विकास निधी आणून पाटण तालुक्यात विकासाची गंगा वाहती ठेवली आहे. विधानसभेमध्ये विविध प्रश्नावर चर्चेत आमदार शंभूराज देसाई यांचा सहभाग असतो. ग्रामीण भागातील आमदार म्हणून शिवसेना नेहमीच शंभूराज देसाई यांना सभागृहांमध्ये बोलण्याची संधी देत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातून शंभूराज देसाई यांना मंत्रीपद मिळणार असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. तो तंतोतंत खरा ठरला आणि शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रीपद शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर शंभूराज देसाई यांनी जे काम केले, चर्चेत सहभाग घेतला, त्याची संपूर्ण माहिती अधिवेशन संपल्यानंतर कराड येथे पत्रकार परिषद घेऊन सातत्याने देत असतात.


आता शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळाले आहे. विस्तारित मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर खाते वाटपामध्ये शंभूराज देसाई यांना गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या खात्यांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. शंभूराज देसाई हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शंभूराज देसाई यांच्या घराण्याला राज्य मंत्रिमंडळात काम करण्याचा पूर्वइतिहास आहे. शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना अनेक खात्यांवर त्यांनी दबदबा निर्माण केला. महत्त्वाचे निर्णय घेतले, हा शंभूराज देसाई कुटुंबियांचा पूर्वानुभव पाहता, शंभूराज देसाई यांना मिळालेल्या खात्यांमध्ये शंभूराज देसाई नक्कीच भरीव काम करून आपले योगदान देतील अशी आशा निर्माण झाली आहे. पाटण तालुका हा दुर्गम डोंगर असल्यामुळे या ठिकाणी विकासाची कामे अनेक आहेत. कारण पाटण मतदारसंघातील अनेक लोक रोजीरोटीसाठी मुंबई-पुणे याठिकाणी जातात, हा लोंढा थांबविण्याचा प्रयत्न शंभूराज देसाई करणार असल्याचे त्यांनी नुकतेच कराड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.


सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची राजकीय वाटचाल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारांनुसार असल्यामुळे शांत, संयमीपणाने बाळासाहेब पाटील राजकारणात आपले पाऊल टाकत असतात. राजकारण केवळ निवडणूकी पुरतेच करायचे, इतर वेळी सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करायचे, अशी पद्धत करून उत्तरमध्ये असल्यामुळे सहकार खात्याचा कारभार पाहताना सहकार खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण संस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने बाळासाहेब पाटील नक्कीच प्रयत्न करतील.कराड नगरपालिकेचे सलक 42 वर्ष नगराध्यक्षपद भूषविण्याचा जागतिक करणारे स्वर्गीय पी.डी. पाटीलसाहेब यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील हे देखील पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकून विकासात्मक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच सहकार खात्याचा कार्यभार सांभाळताना राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सहकार खात्याचा ठसा उमटवतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी जरी बाळासाहेब पाटील असले तरी, सर्वपक्षीय आमदारांच्याबरोबर त्यांचा मित्रत्वाचा स्नेहभाव अतिशय सकारात्मक आहे. यामुळे सहकार खात्याचे काम करताना त्यांना या सर्वांचा अधिक फायदा होणार आहे.


सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यामध्ये आपली भूमिका राज्यस्तरावर कोणती असेल ? हे जाहीर केले आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, काँग्रेस पक्षाचे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आपण ज्या राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असलो तरी, तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका राहील, हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण राज्यस्तरावर काम करण्याची मिळालेल्या संधीमुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची हमी व भूमिका दोन्ही मंत्रीमहोदयांनी घेतलेली आहे.सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा स्वभाव आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वभावामध्ये जरी अंतर असले तरी, विचार एक असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात नक्कीच या दोन मंत्रीमहोदयांच्यामुळे सातारा जिल्हातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि प्रत्येक मतदार संघाला विकासात्मक निधी समप्रमाणात मिळेल.विकासाच्या बाबतीत सातारा जिल्हा आघाडीवर असला तरी, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक योजना रखडल्या आहेत. त्या मार्गी लागणे आवश्यक आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे व शिवसेनेचे असे दोन मंत्री हातात हात घालून विकासाची कामे करणार आहेत.सातारा जिल्ह्यातील जनतेच्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा हे दोन मंत्रीमहोदय कसा प्रयत्न करतात ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image