सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांना न्याय देण्याची भूमिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील...... प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा संपन्न
सातारा (जिमाका) - जिल्ह्यातील प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यावर बरोबर जिल्ह्यातील काही अंशी शिल्लक असलेला पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावणार आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना न्याय देण्याची भूमिका शासनाची असणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, असे सांगून पालकमंत्री. श्री.बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 अखरे वाटप केलेल्या पीक कर्ज व या कालावधीत वाटप पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जाचे 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेल्या मुद्दल व व्याजासह 2 लाखापर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची आवश्यकत नाही. यादी प्रसिध्द केली असून आधार क्रमांक घेणे सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 76130 पात्र शेतकरी असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 41 हजार 659 पात्र शेतकरी तर राष्ट्रीयकृत बँकांकडे 34 हजार 471 पात्र शेतकरी आहे. त्यांना 650 कोटी इतकी रक्कम मिळेल. या योजनेपासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही , अशी ग्वाही देऊन या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना वेळोवळी जिल्हा प्रशासनाला तसेच विविध बँकांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 19-20 या आर्थिक वर्षात संबंधित विभागांना निधी वर्ग करण्यात आला आहे. हा निधी 100 टक्के खर्च करण्याच्या सूचनाही वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. त्या प्रमाणे आढावा घेतला असून 100 टक्के खर्च होईल तसेच 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 345.90 कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेवटी दिले.
विविध पुरस्कारांचे वितरण
गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक, महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत शौर्यपदक, तालुका स्मार्ट ग्राम, जीवन रक्षा पदक, जिल्हा क्रीडा पुरस्कार, लघु उद्योजक पुरस्कारांचे वितरण आज पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
आकर्षक संचलन
यावेळी श्रीपतराव पाटील हायस्कूलने सादर केलेला शिवराज्याभिषेक उत्कृष्ट देखावा, विविध विभागांचे चित्ररथ, दिमाखदार परेड, जिल्हा विविध शाळांच्यावतीने सादर केलेले लेझीम झांज पथकाची प्रात्यक्षिके, परेड संचलनात विविध पथकांनी दिमाखदार संचलन केले. यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, पोलीस बॅण्ड पथक, सैनिक स्कूल, छाबडा सैनिक स्कुलचे संचलन, आरएसपी, विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. उपप्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक वनीकरण आदी उत्कृष्ट चित्ररथांचे संचलन करुन योजनांची जनजागृती केली.