संदीप डाकवे यांना शासनाचा सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान मुंबईत कार्यक्रम: राज्यपालांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती


कराड - पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले.


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारत सरकार ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, आ.राजन पाटील यांनी संदीप डाकवे यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरव केला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी संदीप डाकवे यांच्याबरोबर पत्नी सौ.रेश्मा डाकवे, सौ.सविता निवडूंगे, सुरज शिंदे, प्रमोद माने, अक्षता निवडूंगे, विशाल डाकवे, संजय पाळेकर, स्पंदन डाकवे उपस्थित होते.


वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानात महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री 2020 चे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दि.17 जानेवारी रोजी झाले. त्यानंतर राज्यातील उत्कृष्ट बचत गट, बॅंका आणि सर्वोत्कृष्ट पत्रकारांना पुरस्काराचे वितरण झाले. महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल श्री.संदीप डाकवे यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील तसेच 29 राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण कारागीर सहभागी झाले आहेत. यात 511 स्टाॅल असून त्यापैकी 70 खाद्यपदार्थाचे स्टाॅल आहेत.


दरम्यान, महालक्ष्मी सरस 2020 या नावातील अक्षरगणेशा पत्रकार संदीप डाकवे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांच्याकडे दिला. यावेळी मंचावरील मान्यवरांनी संदीपचे मनःपूर्वक कौतुक केेले.
संदीप डाकवे हे गेली 14 वर्षापासून पत्रकारिता करत आहेत. त्यांना यापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने सन्मानित केले आहे. राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची हॅट्ट्रिक केली आहे. समतोल, विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ लेखन ही त्यांची लेखनाची वैशिष्टये आहेत. अनेक विषयांवर त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. पत्रकारितेबरोबरच त्यांनी व्यंगचित्रातून आपली वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न केला आहे. या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.