भविष्याचा वेध घेतांना अंर्तमुख व्हा : डॉ.संजय कळमकर......युवा वर्गासाठी कराड अर्बन बँकेच्यावतीने उद्योजगता विकास शिबिर संपन्न
कराड दि.२९ (सावा) - युवा पिढीकडून नेहमीच मोठया अपेक्षा व्यक्त होत असतात. स्पर्धेच्या युगामधे युवकांनी आपली बलस्थाने ओळखून स्वयंस्फूर्त व्हायला हवे. आपल्या क्षमतांचा तौलनिक अभ्यास जरूर करावा, मात्र केवळ स्पर्धेसाठी स्पर्धा घातक ठरू शकते. आभासी जगातून बाहेर पडून वास्तव जगात वावरल्याशिवाय सुख दुःखाची खरी ओळख होत नाही. युवकांनी भविष्याचा वेध घेताना अंतर्मुख व्हावे असे डॉ. संजय कळमकर म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्राची अर्थवाहिनी असणाऱ्या दि कराड अर्बन को ऑप बँकेचे वतीने १०३ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून युवा वर्गासाठी उद्योजगता विकास शिबिराचे प्रसंगी डॉ. संजय कळमकर (नगर) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी परिचय करून दिला व सदर उद्योजकता शिबिरांचे आयोजन करण्यामागची बँकेची भूमिका स्पष्ट केली. तसेच बँकेने याआधी आयोजित केलेल्या उद्योजकता शिबिरांचा आढावा घेतला. उद्योजकता विकास शिबिराचे हे नववे वर्ष आहे. कराड अर्बन को ऑप बँकेचे शताब्दी गृहामधे शिबीराचे आयोजित केले होते.
डॉ. संजय कळमकर म्हणाले, युवकांनी विषेशतः घराबाहेर पडतांना पालकांच्या आर्थिक क्षमतांचा विचार करूनच आपले अर्थकारण सांभाळता आले पाहिजे. कौटुंबिक स्वास्थ सांभाळल्यास युवक यशस्वी होतो हे नक्की.' आपल्या खुमासदार शैलीत अनेक वास्तव उदाहरणे देत युवकांना उद्योजकते विषयी सखोल मार्गदर्शन डॉ. कळमकर यांनी याप्रसंगी केले.
प्रास्ताविकामध्ये विचार मांडताना बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम म्हणाले, अर्थकारणापलीकडे युवा पिढी घडविण्यासाठी कराड अर्बन बँक सदैव तत्पर व उत्सुक असते. युवकांचा अर्थकारणातील सजग दृष्टीकोन भारताला महासत्ता बनवणार आहे.
डॉ. संजय कळमकर यांचा बँकेच्या वतीने चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, व्हाईस चेअरमन श्री. समीर जोशी व मुख्यकार्यकारी अधिकारी सी.ए. दिलिपराव गुरव यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या शिबिरासाठी बँकेचे संचालक मंडळ, क-हाड परीसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.