कराडमध्ये कला महोत्सवाचे आयोजन....डॉ. अजय ब्रह्मनाळकर यांनी दिली माहिती


कराडमध्ये कला महोत्सवाचे आयोजन....डॉ. अजय ब्रह्मनाळकर यांनी दिली माहिती


कराड - माहिती तंत्रज्ञान, संगणक, मोबाइल, डिजिटल कॅमेरा, इंटरनेट या मायावी माध्यमांच्या पसाऱ्यात, व्रतस्थ राहून कालसुसंगत नवनिर्मिती करत राहणे ही कलावंताची खरी ओळख आणि कार्य होय. त्याच्या या नवनिर्मितीने समाज विविधांगांनी समृध्द होत राहतो आणि संवेदनशील बनतो. हे घडत असताना कलावन्तांच्या सोबत रसिकांचा संवाद झाला तर त्यांच्या जाणिवा अधिक समृद्ध होऊ शकतात. नेमका हाच हेतू ठेवून कराडच्या रसिकांना, विविध क्षेत्रांतील कलाकारांसोबत त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी देणारा, एक आगळा वेगळा महोत्सव अभिरुची फिल्म क्लबतर्फे आयोजित केला असल्याची माहिती डॉ. अजय ब्रह्मनाळकर यांनी दिली.


कराडकर कलारसिकांसाठी २८, २९ फेब्रुवारी व १ मार्च या तीन दिवसांचे 'अभिरूची कला महोत्सवाचे' आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृहात रात्री ७ ते १० या वेळेत केले आहे. या महोत्सवात २८ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या श्रीमती मंजिरी असनारे केळकर यांचे शास्त्रीय गायन, २९ फेब्रुवारी रोजी "कासव'" चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्याशी चर्चा, १ मार्च रोजी अवघ्या तीन महिन्यांत शंभराव्या प्रयोगाकडे वाटचाल करत असलेले, लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावरचे नवे, चार टी. व्हि. स्टारच्या भूमिका असलेले मराठी नाटक 'आमने सामने'  आणि  २८, २९ फेब्रु. व १ मार्च या तिन्ही दिवसांकरिता स्मृतिसदनाच्या बाजूच्या हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६.००वा. पर्यंत खुले दादासो सुतार, केदार सुतार, भाग्यश्री सुतार, योगेश पवार आणि व अर्पिता पवार अशा पाच चित्रकारांचे चित्रप्रदर्शन भरविले आहे. 


या चित्रकारांचे चित्रप्रदर्शन कराडमध्ये प्रथमच भरत आहे. तीनही दिवस हे चित्रकार प्रदर्शनात हजर राहणार आहेत १ मार्च रोजी सकाळी १० वा. रसिकांशी त्यांचा जाहीर संवाद होणार आहे. अशा प्रकारचा कलाकारांचा प्रत्यक्ष सहभाग असलेला व रसिकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देणारा कला महोत्सव प्रथमच आयोजित केला आहे.  या दर्जेदार कला महोत्सवाचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी रसिकांनी दवडू नये असे आवाहन डॉ. अजय ब्रह्मनाळकर, अभिरुची संस्थेचे प्रतिनिधी यांनी आवाहन केले आहे.